“देव शोधायचा असेल तर तुमच्या सारख्या व्यक्तींमध्येच….”
वृद्धाश्रम, अनाथाश्रम चालवणाऱ्या व्यक्तींचे सेवाकार्य पाहून निलेश राणे झाले भावूक ….
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवादिवस उपक्रमाला ओरोस मंडलातून सुरुवात
कुडाळ | कुणाल मांजरेकर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने सेवादिवस साजरा केला जाणार आहे. याची सुरुवात शनिवारी कुडाळ तालुक्यातील भाजपाच्या ओरोस मंडलातून करण्यात आली. यावेळी कुडाळ-मालवण विधानसभेचे भाजपाचे प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांनी अणाव येथील आनंदाश्रय वृद्धाश्रम, पणदूर येथील निराधार लोकांच्या संविता आश्रम, वेताळबांबर्डे येथील एकलव्य न्यास व कातकरी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या नाग्या महादू वस्तीगृहामध्ये भेट देऊन याठिकाणी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांना रेनकोट, वह्यावाटप सारख्या शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले. जी सेवा तुम्ही करत आहात ती खरोखर कौतुकास्पद असून देव शोधायचा असेल तर तुमच्यासारख्या व्यक्तींमध्ये शोधावा” असे भावुक उद्गार निलेश राणे यांनी व्यक्त केले.
यावेळी आनंदाश्रयचे बबन परब, सविता आश्रमचे संदीप परब, एकलव्य न्यासाच्या रेणुका गावस्कर, नाग्या महादू वस्तीगृहाचे उदय आईर तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा व तालुकास्तरावर सर्व पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, कुडाळ तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे म्हणाले, आपल्यासारखी कामे करणारी माणसे कमी आहेत. त्यामुळे अशा माणसांना आम्ही देव मानतो. देव कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर म्हणजे अनाथ असलेल्या व्यक्तींना आश्रय देऊन त्यांची सेवा करणाऱ्या तुमच्यासारख्या व्यक्तींमध्ये देव आहे. यापुढे आपल्या संस्थेला कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास आम्ही ती करू. आपली सेवा अशीच सुरू ठेवा. आणि अनाथांचे नाथ व्हा. समाजाची काही कामे अशा प्रकारे करणारी माणसे सुद्धा निर्माण झाली पाहिजे. असे सांगून सर्वांच्या कार्याचे कौतुक केले.