मालवणात ढगफुटी सदृष्य पाऊस ; चोहीकडे पाणीच पाणी…

देऊळवाडा मार्गावर पाणी साचल्याने प्रशासनाने रस्ता वाहतुकीसाठी केला बंद

नगरपालिकेकडूनही नागरिकांना खबरदारीचे आवाहन ; आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांक जाहीर

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहराला गुरुवारी दुपार पासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. जवळपास चार ते पाच तास सुरु असलेल्या ढगफुटी सदृष्य पावसाने जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले असून शहरातील बहुतांशी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. देऊळवाडा येथे रस्त्यावर पावसाचे पाणी आल्याने प्रशासनाने हा रस्ता खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवला होता. दरम्यान, मालवण नगरपालिकेने नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले असून संभाव्य पाणी येण्याच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये अशा सूचना करीत आपत्कालीन परिस्थितीत १८००२३३४३८१ यांसह ९३७३९८६३५५, ९४०३५५७३४१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

मालवण शहरात आज पाणीच पाणी पाहायला मिळाले. बाजारपेठेसह बसस्थानक, मॅकेनिकल रोड, आडवण देऊळवाडा, दांडी, मेढा, रेवतळे, धुरीवाडा, वायरी, गवंडीवाडा येथील रस्ते पाण्याखाली गेले होते. तर देऊळवाडा येथे रस्त्यावर पाणी आल्याने येथील मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तर बस स्थानक परिसरात काही नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते.

नगरपालिकचे नागरिकांना आवाहन

सिंधुदुर्ग जिल्हयात रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला असून मालवण शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच समुद्र उच्चतम भरती कालावधी असल्याने शहरातील सर्व नाले, व्हाळया दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच आडवण देऊळवाडा, दांडी, मेढा, रेवतळे, धुरीवाडा, वायरी, गवंडीवाडा, बाजारपेठ इत्यादी भागातील पाणी निचरा होण्यास अतिवृष्टी व हाय टाईड मुळे वेळ लागत आहे. तरी नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून संभाव्य पाणी येण्याच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. तसेच पाणी आलेल्या मोरी, नाले इत्यादी ठिकाणातून वाहने चालवू नयेत किंवा चालत जाण्याचे धाडस करू नये तसेच पाणी कमी झाल्याशिवाय वाहने घालू नयेत असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे. तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व भरती कालावधीमध्ये सखल भागांमध्ये पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे. शहरातील देउळवाडा, आडवण, आडारी, दांडी, मोरेश्वर, वायरी, येथेही पाणी येण्याचा धोका असल्याने तेथे कोणीही पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये. कोणत्याही घराला लगतच्या डोंगर, दरड अथवा पुराच्या पाण्यापासून धोका उद्भवून आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरीत योग्य अशा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होऊन आवश्यकत्या मदतीसाठी तातडीने मालवण नगरपरिषदेच्या आपत्कालीन कक्ष क्रमांक 18002334381 व मोबाईल नं. 9373986355, 9403557341 येथे संपर्क साधावा असे आवाहन मुख्य अधिकारी, मालवण नगरपरिषद यांच्याकडून करण्यात येत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3593

Leave a Reply

error: Content is protected !!