सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी

शुक्रवारी शाळा, महाविद्यालये बंद राहणार : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केलं जाहीर

मालवण | कुणाल मांजरेकर

जिल्ह्यात सलग सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजुलक्ष्मी यांनी सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. २१ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना सुट्टी जाहीर केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्व सुचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. ज्याअर्थी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क्र.२ कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सद्यस्थिती मध्ये अतिवृष्टी होत असून दिनांक २० जुलै ते २३ जुलै २३ या कालावधीत जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर केलेला आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळी देखील वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे प्राप्त सूचनेनुसार कोंकण विभागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करणे बाबतच्या सूचना या कार्यालयाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व दिनांक ०२/०८/२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!