मालवणातही “इर्शाळवाडी”च्या पुनरावृत्तीची भीती ; ठाकरे शिवसेनेने वेधलं लक्ष ….
शहरातील देऊळवाडा प्राथमिक शाळेच्या मागील डोंगर खचला ; मुले धोक्याच्या छायेत
जिल्हा परिषद प्रशासनाने शाळेमागील संरक्षक भिंतीची तात्काळ डागडुजी करावी : हरी खोबरेकर यांची मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
रायगड जिल्ह्यातील खालापूर इर्शाळवाडी येथे घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे धोकादायक दरडींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मालवण शहरातील देऊळवाडा प्राथमिक शाळेच्या पाठीमागील भागात डोंगर कोसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रशालेच्या व्यवस्थापनाने तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे यापूर्वीच लक्ष वेधले आहे. याची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी येथील परिस्थितीची पाहणी केली. शाळेच्या मागील संरक्षक भिंतीची डागडुजी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.
देऊळवाडा प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग असून येथे २४ विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेच्या मागील डोंगर खचत असून शाळेच्या स्वच्छतागृहाच्या नजिक डोंगराची माती खाली येत आहे. याबाबत आठ दिवसांपूर्वीच प्रशालेच्या वतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. “देऊळवाडा शाळेच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराचे पावसामुळे खच्चीकरण होत आहे. हा डोंगर स्वच्छता गृहाच्या मागील बाजूस असून मुलांना स्वच्छता गृहाचा वापर करता येत नाही. तरी याची पाहणी करावी”, अशी मागणी १० जुलै रोजी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
या गंभीर बाबीची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, सुहास वालावलकर, निना मुंबरकर यांनी दिल्यानंतर तालूकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी येथे पाहणी केली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, सन्मेष परब, उमेश चव्हाण, उमेश मांजरेकर, सुहास वालावलकर, निना मुंबरकर, हेमंत मोंडकर, अशोक मराळ यांच्यासह रत्नाकर सामंत, मुख्याध्यापिका रश्मी सामंत आदी उपस्थित होते.
देऊळवाडा शाळेच्या मागील भागात डोंगर खचत असून ही बाब अतिशय गंभीर आहे. प्रशासनाने तात्काळ याठिकाणी पाहणी करावी. येथील स्वच्छतागृहात जाणे विद्यार्थ्यांना धोकादायक बनले आहे. येथील संरक्षक भिंतीच्या नूतनीकरणासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करून हे काम विनाविलंब पूर्ण करावे, अशी मागणी हरी खोबरेकर यांनी केली आहे.