तब्बल ४५ घरफोड्या करणारा सराईत आंतरराज्य चोरटा पोलिसांच्या जाळ्यात ; सिंधुदुर्ग पोलिसांचं मोठं यश !
गावठी कट्टा, बंदूक, जिवंत काडतूसे, पाच तलवारींसह तब्बल ४ लाख ६९ हजारांची रोकड हस्तगत
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई ; पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची माहिती
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ४५ घरफोडी करून चोरी करणाऱ्या आंतरराज्य सराईत गुन्हेगारास अटक करण्यात सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. प्रकाश विनायक पाटील (वय ३८, रा. घर नं. 74. घाटवाडा, पडोसे, सत्तरी नॉर्थ गोवा) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा, बंदूक, जिवंत काडतूसे, पाच तलवारींसह तब्बल ४ लाख ६९ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओरोस येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, १२ जुलै रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शेळके, सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री. कोयंडे, पोहको जामसंडेकर, पोहेको केसरकर, पोको इंगळे असे शासकीय गाडीने कणकवली पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील हा त्याच्याकडील कार नं. जी ए ०५ एफ-४६०१ ने प्रवास करताना मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी करता त्याच्याकडून १ गावठी कट्टा, ३ जिवंत राउंड, १ काडतूस बंदूक, २७ जिवंत काडतूसे, ५ तलवारी, रोख रक्कम ४ लाख ६९ हजार ९५० रुपये, लोखंडी हातोडा, पक्कड, कटावणी, ११ विविध कंपन्यांचे मोबाइल हँडसेट, १६६ ग्रॅम १६ मिली वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत रुपये ९,६८,४९०, ५ किलो ३०० ग्रॅम चांदीच्या विटा व दागिने किंमत रुपये ३,३५,८४४, पैसे मोजण्याची इलेक्ट्रीक मशिन, सोने चांदी वितळविण्याची इलेक्ट्रीक मशिन, ३ ड्रिल मशिन, एक दुचाकी व एक चारचाकी वाहन असा एकूण ३०,४८,७८४ रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास कणकवली पोलीस ठाण्यामार्फत सुरु आहे.
आरोपी प्रकाश पाटील हा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याचेविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये ४ गुन्हे, कोल्हापूर जिल्हयामध्ये ९ गुन्हे, गोवा राज्यात ४. कर्नाटक राज्यात २४ असे एकूण ४५ गुन्हे दाखल आहेत. तसेच तो काही गुन्हयांमध्ये पाहिजे व काही गुन्हयांमध्ये फरार आरोपी म्हणून घोषीत आहे. सदर आरोपी विरोधात कणकवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करून सदर आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेली अग्नीशस्त्र व घातक तलवारी, कोयता, चाकू, सुरा यांचा कोणत्या कारणासाठी साठा केलेला होता याबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संदिप भोसले, सहा. पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र बाग पोलीस उप निरीक्षक श्री. रामचंद्र शेळके, सहा. पोलीस उप निरीक्षक गुरुनाथ कोडे, पोलीस अंमलदार राजेंद्र जामसंडेकर, कृष्णा केसरकर प्रकाश कदम, अनुपकुमार खंड आशिष गंगावणे, रुपाली खानोलकर, आशिष जामदार चंद्रकांत पालकर, चंद्रहास नार्वेकर, रवि इंगळे यांनी केलेली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली आहे.