मालवणच्या भुयारी गटार आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका …

भाजपच्या विजय केनवडेकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी ; पालकमंत्र्यांकडून कारवाईचे लेखी आदेश

भुयारी गटार योजना कार्यान्वित करण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी

मालवण | कुणाल मांजरेकर

केंद्र शासनाकडील UIDSSMT योजनेतून मालवण नगर परिषदेचा भुयारी गटार योजना व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प १३ वर्षे होऊनही पूर्ण होऊ शकला नाही. मालवण शहराला आवश्यक असणारी ही भूयारी गटार योजना होणे आवश्यक आहे. या उद्देशाने २६ ऑगस्ट २००९ रोजी कार्यारंभ झालेली योजना अजूनही पूर्ण होऊ शकत नाही. या कामांमध्ये ठेकेदाराकडून होणारी दिरंगाई, कामाचे नसणारे नियोजन यामुळेच योजना मार्गस्थ होत नाही. प्रकल्पाच्या ८५% रक्कम अदा करूनही ठेकेदार काम करू शकला नाही. सदरील कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाईचे लेखी आदेश दिल्याची माहिती श्री. केनवडेकर यांनी दिली आहे.

या कामाच्या ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय चौकशी न होता याच्यावर काम विलंबासाठी दंडात्मक कारवाई एकदाही झालेली नाही. व्ही. आर. घुगे औरंगाबाद यांच्याकडे कंत्राट असताना सब कंत्राटदार म्हणून उत्तरवार काम पहात आहेत. सब कंत्राटदारामुळेच या कामाचा पुर्ण सत्यानाश झाला आहे. हा ठेकेदार पूर्णपणे आर्थिक अडचणीत असून सर्व बँकांमध्ये थकीत आहे. त्यामुळे पुढील काम या ठेकेदाराकडून होणे शक्य नाही. तसेच या योजनेमार्फतच ३२ वेळा कामासाठी बिल दिले असून यंत्रसामुग्री आणण्यासाठी दोन कोटी निधी या ठेकेदारास दिलेला होता. या ठेकेदाराने नगरपालिकेच्या सभेमध्ये आपण साहित्याची ऑर्डर दिली असून त्या संबंधित असणारे कागद सभागृहाला दाखवले होते. मात्र तीन वर्ष होऊनही एकही यंत्रसामुग्री नगरपालिकेकडे उपलब्ध झालेली नाही. यासंबंधी प्रशासनाने याला स्मरणपत्र दिले असता यासंबंधी कोणतेही उत्तर न देता वाढीव निधी उपलब्ध करून द्या तरच मी काम करू शकतो अशी अट घालून अरेरावीची भाषा करताना दिसत आहे. STP-3 MLD चे प्रलंबीत पैसे घेऊन ठेका सोडण्याच्या मनस्थितीत ठेकेदार आहे. असे झाल्यास ठेकेदार व प्रशासनाच्या विरोधात जनयाचिका भाजपा मार्फत दाखल करण्यात येणार आहे. या ठेकेदाराकडून हा प्रकल्प पूर्ण होणार नसून याचे पुनर्लोकन करून उर्वरित कामाची नवीन निविदा काढावी व या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. पूर्ण कामाचे ऑडिट झाल्याशिवाय मालवण नगरपालिकेकडे असणारी अनामत रक्कम देण्यात येऊ नये, अशी मागणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच उर्वरित कामासाठी आवश्यक चार कोटी चा निधी लवकरात लवकर मालवण नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे. २००९ च्या प्रकल्प अहवालाप्रमाणे कोणताही ठेकेदार काम करण्यास तयार होणार नसून यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा व मागील ठेकेदाराची पूर्णपणे चौकशी करावी. उर्वरित कामाची नविन निविदा तयार करण्यात यावी, अशी विनंती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना करण्यात आली आहे, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!