संजय गांधी निराधार योजनेच्या पहिल्याच सभेत ४० प्रस्तावांना मंजुरी
मालवण : मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान समिती समितीच्या पहिल्याच बैठकीत ४० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यापुढेही जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना या योजनांचा लाभ देण्यात येईल. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेन, असे प्रतिपादन समिती अध्यक्ष महेश मांजरेकर यांनी केले.
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची पहिलीच बैठक समिती अध्यक्ष महेश मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली मालवण तहसील कार्यालयात पार पडली. यावेळी तहसीलदार वर्षा झालटे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष महेश मांजरेकर आणि सर्व सदस्यांचे स्वागत केले. यावेळी समिती सदस्य राजेश तांबे, श्रीमती. माधुरी मसुरकर, राजन माणगावकर, जयप्रकाश परुळेकर, राजेंद्र आंबेरकर, मधुकर चव्हाण शासकीय प्रतिनिधी गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर आदी उपस्थित होते.
या सभेत ४० प्रस्ताव ठेवण्यात आले होते. या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. संजय गांधी योजना समिती अंतर्गत सध्यस्थितीत एकूण ३९१९ लाभार्थी आहेत. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून गरजवंतांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राजकीय, सामाजिक संघटना, संस्था यांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे मानधन अनुदान १५०० रुपये मंजूर झाले असून शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे जुलै २०२३ पासून १५०० रुपये मानधन लाभार्थ्यांना प्राप्त होणार आहे. तसेच लाभार्थ्यांच्या मुलांची वय २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास अनुदान बंद होत होते. ही अट सुद्धा शासनाने रद्द केली आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करून शासनाचे अभिनंदन करताना आभार मानण्यात आल्याचे मांजरेकर यांनी सांगितले.