एक सही संतापाची….
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती विरोधात मनसेच्या वतीने सोमवारी मालवणच्या भरड नाक्यावर अनोखं सह्यांचं आंदोलन
मालवण | कुणाल मांजरेकर
महाराष्ट्रात सध्या घडणाऱ्या राजकीय नाट्यामुळे सर्वसामान्य जनतेत संताप व्यक्त होत आहे. या संतापाला वाट करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवणच्या भरड नाक्यावर सोमवारी १० जुलै रोजी “एक सही संतापाची” हे अनोखं आंदोलन हाती घेण्यात आलं आहे.
याबाबत मनसेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, सध्याची राजकीय परिस्थिती बघता संपूर्ण राजकारणाचा महाराष्ट्रामध्ये चिखल झाला आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली होती, ज्या महाराष्ट्राने देशातील लोकांना विचार दिला होता, आता तो महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र आपण बघतोय. राजकारण काही ठराविक लोक आपल्या स्वार्थासाठी गालिच्छ करत आहेत. जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवून राजकारणाचा राजकीय लोकांनी बाजार मांडला आहे. या गलिच्छ राजकारणाची चीड, संताप जनतेत आहे. ती कृतीच्या माध्यमातून व्यक्त व्हावी म्हणून येत्या सोमवारी भरड नाका येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवणच्यावतीने एक सही संतापाचीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक कुबल व तालुकाध्यक्ष संदीप लाड यांनी दिली आहे.