ठाकरे गटाकडून पुन्हा दिशाभूल ; सिंधुरत्न मध्ये “त्या” कामांचा समावेशच नाही !

विजय केनवडेकर यांनी दाखवली कागदपत्रे ; वैभव नाईकांच्या कार्यकर्त्यांकडून “खोटे बोला पण रेटून बोला” चे पुन्हा दर्शन

मालवण : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपूराव्यातून सिंधुरत्न योजनेतून मालवण शहरातील धुरीवाडा ते रेवतळे येथील भूमिगत विद्युत वाहिनीसाठी २० लाख रुपये तर मेढा कोतेवाडा येथील विज संबंधित कामासाठी ३ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाकडून देण्यात आली होती. मात्र अशा प्रकारचा कोणताच निधी सिंधुरत्न योजनेतून मंजूरच झाला नसल्याची माहिती भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. याबाबतची कागदपत्रेच यावेळी सादर करण्यात आली. ठाकरे गट जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करत असून यानिमित्ताने “खोटे बोला पण रेटून बोला” चा प्रत्यय पुन्हा एकदा आल्याचे ते म्हणाले.

भाजपच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, आपा लुडबे, गणेश कुशे, पूजा सरकारे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, आबा हडकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, प्रमोद करलकर, निनाद बादेकर, राज कांदळकर आदी उपस्थित होते. यावेळी विजय केनवडेकर म्हणाले, उद्धव ठाकरे गटाने दोन दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सिंधुरत्न योजनेतून मालवण शहरातील मेढा आणि धुरीवाडा येथील दोन कामे मंजूर झाल्याचे म्हटले होते. मात्र याबाबत अधिकारी वर्गाकडून माहिती घेतली असता अशा प्रकारचा कोणताही निधी मंजूर झाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ठाकरे गट जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंधूरत्न योजनेसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी ९० कोटी ९८ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. येत्या १० जुलै रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीत या योजनेतील प्राप्त प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी मिळेल अशी शक्यता आहे. तर मंजूर कामांना राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरच निधी उपलब्ध होईल. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून याबाबत पाठपुरावा सुरू आहे. असे असताना आमदार वैभव नाईक मात्र खोटे बोला पण रेटून बोला यानुसार अद्याप मंजूरी न मिळालेली कामे आपणच मंजूर केल्याचे सांगून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. आमदार नाईक यांनी कधीतरी खरे बोलावे, असा टोला विजय केनवडेकर यांनी लगावला आहे.

यावेळी श्री. केनवडेकर यांनी सिंधुरत्न समिती सदस्य प्रमोद जठार यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना सादर केलेले निवेदन, पालकमंत्री यांनी निवेदनावर तात्काळ कारवाईसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेले निर्देश, समिती अध्यक्ष तथा शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनीही केलेली कार्यवाही, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी केलेली सूचना याबाबत केलेली कार्यवाही याची पत्रेच सादर केली. तसेच जिल्हा नियोजनच्या सभेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांच्या कामाची माहिती दिली. भाजपच्या पाठपुराव्यातून होत असलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी जे प्रस्ताव अद्याप मंजूरच नाहीत, त्यांची माहिती मीडियात देण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार करत आहेत, असाही आरोप केला.

मालवण शहर व तालुक्यात जास्तीत जास्त विकासनिधी मिळावा यासाठी भाजप कुडाळ मालवण विधनसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच अनेक कामे मंजूर होणार आहेत. मालवण शहरातील विकासकामांसाठी नुकतेच सुमारे ६ कोटी ६४ लाख रूपयांची निधी मिळाला. तसेच इतरही कामांसाठी ७ कोटी रूपयांची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. मच्छिमार बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जे प्रस्ताव आले त्यात निलेश राणे यांच्या सुचनेनंतर आणखी वाढ करून अधिकाधिक मच्छिमार बांधवांना या योजनेतून लाभ देण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. असे केनवडेकर म्हणाले.

संपूर्ण किनारपट्टीवरील भुमीगत वीज वाहिन्यांसाठी केंद्र शासनाने ३०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचाही यात महत्वपूर्ण पाठवपुरावा आहे. मंजूर निधीतून तालुका व शहरातील बहुतांश कामे केली जाणार आहेत. किनारपट्टी भागात कामे होणार आहेत. असे असताना आमदारांकडून श्रेय लाटण्याचा प्रकार सुरू आहे. मालवणसाठी आवश्यक निधी मंजूर होण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा केलेला आहे, असेही श्री. केनवडेकर यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या काळात फक्त ८ कोटी ३२ लाख रूपये रत्नसिंधु योजनेसाठी देण्यात आले होते. त्यावेळी आमदार वैभव नाईक यांनी निधी आणणे शक्य झाले नाही. आता भाजपकडून कोट्यावधी निधी येणार असल्याचे समजल्यानंतर जी कामे प्रस्तावित आहेत. अशी सगळीच माहिती देवून आपण काम करत असल्याचा दिखावा करत श्रेय घेण्याचाप्रयत्न केला जात आहे. आमदार नाईक यांनी एकाही कामासाठी साधे पत्रही दिलेले नसल्याचेही केनवडेकर यांनी सांगितले. खोटे बोला पण रेटून बोला ही आमदारांची जुनीच ओळख आहे. आता त्यांच्या कार्यकर्त्यांनाही खोटे बालण्याचे धडे दिले जात आहेत. मात्र भाजपने केलेल्या कामाचे श्रेय हे भाजपच घेणार असे केनवडेकर यांनी ठणकावले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!