श्रावणमध्ये शिक्षकांसाठी पालक आक्रमक ; पंचायत समितीत धडक
नियुक्ती झालेले शिक्षक अन्य शाळेत कामगिरीवर पाठवण्यात आल्याने पालकांनी शाळा ठेवली बंद
मालवण : मालवण तालुक्यातील अनेक शाळांत रिक्त शिक्षक प्रश्नी पालक संतप्त बनले आहेत. श्रावण येथील महात्मा गांधी विद्यालय जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षक प्रश्नी पालक आक्रमक बनले. मुलांना शाळेत न पाठवता शाळा बंद करून पालकांनी शुक्रवारी मालवण पंचायत समिती येथे धडक देत आंदोलन केले.
४२ विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत मुळातच कमी शिक्षक. त्यात ३ शिक्षकांच्या जागी बदली होऊन आलेल्या २ शिक्षकां पैकी एका शिक्षकाना अन्य शाळेत कामगिरीवर पाठवल्याने पालक अधिकच आक्रमक बनले आहेत. ज्या शिक्षकांची शाळेत नियुक्ती झाली त्या शिक्षकांना जोपर्यंत पुन्हा या शाळेत नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत शाळा बंद आंदोलन सुरूच ठेवणार असे पालकांनी सांगितले. गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी यावर त्वरित मार्ग काढावा अशी भूमिका पालकांनी मांडली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवराम परब, उपाध्यक्ष संगीता वेदरे, सरपंच नम्रता मुद्राळे, माजी सरपंच प्रशांत परब, ग्राप सदस्य लक्ष्मीकांत मुद्राळे यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.