शिक्षणाचा खेळखंडोबा ; एक महिन्यानंतरही “टोपीवाला प्राथमिक”च्या मुलांना पुस्तकांची प्रतीक्षाच !
पालक संतप्त ; प्रसंगी आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा
मालवण : शिक्षण विभागामार्फत शाळांना मोफत पुस्तके देण्यात येतात. त्या पुस्तका मध्येच काही रिकामी पाने ठेवून त्यात प्रश्न उत्तर लिहायची असतात. मात्र मालवण शहरातील मोठी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळेपैकी एक असलेल्या मोहनराव परुळेकर (टोपीवाला प्राथमिक शाळा) मधील मुलांना शाळा सूरू होऊन एक महिना झाला तरी अद्याप पुस्तके न मिळाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याबाबत प्रशालेच्या शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष भाई मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त करीत प्रसंगी आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे.
प्रशालेला काही दिवसांपूर्वी जी पुस्तके आली आहेत, ती सर्व विद्यार्थ्यांना पुरेशी नाहीत. 50 टक्के पुस्तके आली. आलेली पुस्तके कोणत्या विद्यार्थ्यांना द्यावी? असा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे सर्व विद्यार्थी यांची पुस्तके मिळाल्याशिवाय पुस्तके वितरित न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत शिक्षक पालक संघ अध्यक्ष भाई मांजरेकर यांनी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून तातडीने पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. शासनाने मोफत पुस्तके देण्याचा निर्णय घेतल्याने दुकानातही ही पुस्तके विक्रीला नसतात. अन्यथा काही पालकांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुस्तके विकत घेतली असती. मात्र पुस्तके विकत मिळत नसल्याने समस्या अधिक प्रमाणात निर्माण झाली आहे. अद्याप पुस्तके न मिळाल्याने पालक संतप्त बनले आहेत. प्रसंगी आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल असे मांजरेकर यांनी सांगितले आहे.