दादा वाघ ज्या महासागराची भाषा करतायत, त्या महासागरात बुडून ते कधीच बाजूला फेकले गेलेत…

बाबी जोगी यांचा पलटवार ; थेट नगराध्यक्ष निवडणुकीत आचरेकरांची पत मालवणच्या जनतेने दाखवल्याचा टोला

पक्षातून बाजूला फेकल्या गेलेल्या पावसाळी बेडकांना हाताशी धरून आमच्यावर टीका न करता आचरेकर यांनी स्वतः बोलावे

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवणात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजपात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावर टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांच्यावर भाजपाचे माजी शहराध्यक्ष दादा वाघ यांनी केलेल्या जहरी टीकेला जोगी यांनी तेवढेच कडक प्रत्युत्तर दिले आहे. दादा वाघ लोकनेते म्हणत असलेल्या सुदेश आचरेकर यांची पत थेट नगराध्यक्ष निवडणुकीत मालवणच्या जनतेने दाखवून दिली आहे. तसेच दादा वाघ ज्या महासागराची भाषा करतायत, त्या महासागरात बुडून ते कधीच बाजूला फेकले गेले आहेत. तीच अवस्था आचरेकर यांचीही होईल. कारण त्या महासागरात कित्येक पैशाने भरलेले ट्रक गायब झाले आहेत. येत्या निवडणुकीत जनता ह्यांना नक्कीच महासागरातून काढून जमिनीवर आपटेल. आमदार वैभव नाईक हे सलग दोनदा विकास कामांच्या जोरावर निवडून आले आहेत. येत्या निवडणुकीत ते विजयाची हॅट्रिक करतील, असा विश्वास व्यक्त करून सुदेश आचरेकर यांनी जनतेसाठी काहीही न केलेल्या आणि पक्षातून बाजूला फेकल्या गेलेल्या पावसाळी बेडकांना हाताशी धरून टीका करण्यापेक्षा स्वतः बोलावे, त्यांना आम्ही अधिक चांगल्या प्रकारे उत्तर देऊ, असा पलटवार बाबी जोगी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

श्री. जोगी यांनी म्हटले आहे की, सुदेश आचरेकर यांच्या समर्थनार्थ आलेल्या पावसाळी बेडकांना मी किंमत देत नाही. भारतीय जनता पक्ष महासागर आहे तर सुदेश आचरेकर लोकनेते आहेत असे तुम्ही म्हणत असाल तर तुमचे आधी नेते ठरवा. सुदेश आचरेकर की नारायण राणे साहेब, निलेश राणे की नितेश राणे. ज्या डबक्याची भाषा तुम्ही करताय तेच डबकं ज्यावेळी दर्यात समुद्रात लाटा रुपी संकट होडीवर येतं व होडीत पाणी भरतं, ते पाणी जसं मच्छीमार होडीतून समुद्रात फेकतो, तसंच येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला फेकून देऊन पुढे जाऊ हा आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे डबक्याची भाषा आमच्याबरोबर करू नका. आचरेकर ना तुम्ही लोकनेते म्हणता, लोकनेते होण्याएवढे अजून तरी आचरेकरांची एवढी पत नाही. गेल्या नगरपालिका निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची वेळ जनतेवर आली, त्यावेळी सुदेश आचरेकरांची यांची काय अवस्था आहे हे मालवणातील जनतेने दाखवून दिलं. कुणाची लायकी किंवा अपशब्द बोलण्याइतपत मी अडाणी नाही. त्यामुळे मी कोणाची लायकी, ऐपत किंवा खालच्या पातळीत टीका करणार नाही ही आम्हाला शिकवण आहे. बुडण्याची भीती आम्हाला दाखवू नका, पोहण्यात आम्ही एक्सपर्ट आहोत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुदेश आचरेकरांना नक्की बुडवू. सुदेश आचरेकरांनी नगरपालिकेत काय दिवे लावले हे जनतेला माहित आहे. म्हणूनच तर ते थेट नगराध्यक्ष निवडणुकीत रसातळाला गेले. आमदारांच्या नऊ वर्षाच्या काळामध्ये जो विकास झाला, तो मागील पंचवीस वर्षात झाला नाही. जी कामे तुम्ही सांगताय ती सगळी काम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते वेळी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार नाईक यांच्यामुळे मंजूर झालेली होती. त्यामुळे वाघ तुम्ही उगीच दुसऱ्याने सांगितलेली प्रेस घेऊन बळीचा बकरा होऊ नका. पंचायत समिती येथे झालेल्या आंदोलन वेळी मी आमदारांसोबतच तिथे होतो आणि आमदारांसोबतच राहीन. आम्ही कधी आयुष्यात लावालावी केली नाही आणि ती आमच्या रक्तात नाही. म्हणून तर सलग दोन टर्म मी शिवसेनेचा मालवण शहरप्रमुख झालो. मी शहरप्रमुख झाल्यावर शिवसेनेचा नगराध्यक्ष पाच वर्षासाठी बसला. नगरपालिकेत चिरीमिरीचा खेळ कोण करीत होते, हे वाघ तुम्ही स्वतः बोलून दाखवत होता आणि त्याच लोकांचा तुम्ही आता पुळका घेत आहात, हा बदल कशासाठी ? असा सवाल बाबी जोगी यांनी केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!