सरकारी यंत्रणा बांग्लादेशी नागरिकांना पोसण्याचे काम करतायत का ?
आ. वैभव नाईक यांचा सवाल ; पी.एम.किसानच्या बांग्लादेशी लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा “शासन आपल्या दारी” कार्यक्रम घ्यावा
पी.एम.किसानचा बांग्लादेशी नागरिकांना लाभ देणाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
मालवण : कुडाळ तालुक्यातील काही गावांमधून शेकडो बांग्लादेशी नागरिकांनी पी.एम. किसान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केला आहे. प्रशासनाने त्यांचे अर्ज वैध ठरवून सात सात हप्ते त्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारा विरोधात आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांची भेट घेऊन याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी देखील फोनवर चर्चा करुन चौकशी करण्यास सांगितले. पी.एम.किसान योजनेचा बांग्लादेशी नागरिकांना लाभ देणाऱ्या दोषींवर कडक कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा आ. वैभव नाईक यांनी याप्रसंगी दिला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. वैभव नाईक म्हणाले, पी. एम. किसान योजनेमध्ये कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावे शेकडो बांग्लादेशी लाभार्थी ग्राह्य धरून त्यांच्या खात्यात सात सात हप्ते शासनाने जमा केले आहेत.हे एका महिन्यात झाले नाहीत. दोन वर्षे प्रशासनाचा हा भोंगळ कारभार सुरु आहे.त्यामुळे अधिकारी कर्मचारी झोपले आहेत का? असा सवाल आ.वैभव नाईक यांनी करत या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून प्रखर आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सिंधुदुर्गात यावं आणि या बांग्लादेशी लाभार्थ्यांना लाभ द्यावा अशी खोचक टीका आ. वैभव नाईक यांनी केली.देशातील जनतेचे पैसे बांग्लादेशी नागरिकांना देऊन सरकारी यंत्रणा बांग्लादेशी नागरिकांना पोसण्याचे काम करत आहेत का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर शासन आपल्या दारी कार्यक्रमाअंतर्गत अशाच खोट्या लाभार्थ्यांना लाभ दिले आहेत का याचीही चौकशी व्हावी. तसेच जिल्ह्यातील इतरही गावात असे बांग्लादेशी लाभ घेत असतील तर सरपंच यांनी गावातील लाभार्थ्यांच्या नावांची शहानिशा करावी असे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले.