मालवण : गुटखा, पानमसाला विक्रीच्या आरोपातून संशयिताची निर्दोष मुक्तता
संशयिताच्यावतीने ॲड. रुपेश परुळेकर व ॲड.अक्षय सामंत यांचा युक्तिवाद
मालवण | कुणाल मांजरेकर
मानवी शरीरास अपायकारक असा गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला इत्यादी विक्रीसाठी साठून ठेवल्याच्या आरोपातून सुभाष वसंत पाटील (रा. गवंडीवाडा मालवण) यांची ओरोस येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग श्री. एस. डी. चव्हाण यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयीताच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर व ॲड.अक्षय सामंत यांनी युक्तिवाद केला.
१७ फेब्रुवारी २०१६ रोजी तत्कालीन मालवण पोलिस निरीक्षक शंकर तुकाराम पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सोमवार पेठ भाजी मार्केट मालवण येथील एका जनरल स्टोअर्स दुकानात छापा टाकून मानवी शरीरास अपायकारक असा गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला इत्यादी विक्रीसाठी साठून ठेवलेला असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला रक्कम रुपये २७२९०/- चा साठा जप्त केला होता. प्रशांत शिवराम पवार, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग यांनी सदर घटनेबाबत आरोपी सुभाष वसंत पाटील रा. गवंडीवाडा मालवण यांचेविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६, चे कलम २६(२)(i) सह कलम (२७)(१), कलम ३(१)(zz)(i) सह कलम २६(२)(iv) सह कलम ३०(२)(१) अन्वये फिर्याद दाखल केली होती. सदर खटल्याची सुनावणी ओरोस येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी सिंधुदुर्ग एस. डी. चव्हाण यांच्या कोर्टात पूर्ण झाली. साक्षीदारांच्या साक्षितील विसंगती व आरोपी विरुद्ध दोष सिध्दी करिता पुरेसा सबळ पुरावा नसल्याचे कारणास्तव आरोपीचे वकील ॲड. रुपेश परुळेकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी सुभाष वसंत पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.