ओरोस येथे गोकुळचे विभागीय कार्यालय सुरु
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते उदघाटन
सिंधूनगरी (प्रतिनिधी)
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (गोकुळ) च्या ओरोस येथील कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते फित कापुन शुक्रवारी करण्यात आले. जिल्हा बँक प्रधान कार्यालय समोरील ओरोस प्रधिकरण क्षेत्र येथील जागेत हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे.
सदर कार्यालय ओरोस येथे व्हावे अशी मागणी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतक-यांची होती. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केलेल्या पाठपुरव्या नंतर गोकुळने अखेर विभागीय कार्यालय सुरू केले आहे. या उद्घाटन प्रसंगी गोकुळचे डॉ. नितीन रेडकर पशुवैद्यकीय अधिकारी, अनिल शिखरे दूध संकलन अधिकारी, शिरीष खोपडे मार्केटिंग प्रमुख कोकण विभाग, संजय पाटील मिल्कोटेस्टर विभाग प्रमुख, भगवंत गावडे विस्तार सुपर व्हायझर, प्रसाद कोरगावकर, प्रशांत म्हापणकर तसेच जिल्हा बँक अधिकारी भाग्येश बागायतकर, मंदार चव्हाण आदी उपस्थित होते. सदर कार्यालय हे जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्था यांच्यासाठी संपर्क कार्यालय म्हणून राहणार आहे. सदर कार्यालयातून सध्याच्या पशुसंवर्धन सेवा संकलन विभागाचे कामकाज चालेल. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पशुवैद्यकीय सेवा,जंत निर्मूलन औषध वाटप, वैरण बियाणे वाटप,कृत्रिम रेतन पूरक साहित्य पुरवठा तसेच कागदोपत्री व्यवहार केले जातील.संकलन विभागा अंतर्गत संस्थांच्या संकलन विषयक कामकाज, तक्रारी निवारण,उत्पादकांना मार्गदर्शन दुध संस्था प्रतिनिधींना सर्व प्रकारची प्रशिक्षण,मासिक मीटिंग यासारखे कामकाज या कार्यालयातून केले जाणार आहे. सिंधूदुर्ग जिल्हा बँक, गोकुळ,भगिरथ प्रतिष्ठान, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दुध वाढ कार्यक्रम सुरू असल्याने सर्व दृष्टीने संपर्क साधण्यासाठी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा बँकेच्या सहाय्याने सदर कार्यालय सुरू करण्यात आले आहे.