सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ८२५ कोटी मंजूर
किनारपट्टी भागात भूमिगत वीज वाहिन्या आणि मजबूतीकरणाची कामे मार्गी लागणार
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती ; पहिल्या टप्प्यात ३०० कोटींच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया
मालवण | कुणाल मांजरेकर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने राज्य शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमिगत वीजवाहिन्या तसेच नवीन साहित्य व मजबुतीकरण कामांसाठी ८२५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील ३०० कोटींच्या कामांचे टेंडर काढण्यात आले असून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच कामाला सुरुवात होणार आहे. देवबाग, तारकर्ली, वायरी येथे भूमिगत वीज वाहिन्या टाकून तसेच जीर्ण साहित्य बदलून येथील विजेच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील. अन्य भागातील कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मालवण येथे शनिवारी दिली.
मालवण भाजप कार्यालय येथे राजन तेली यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, केपी चव्हाण, महेश गांवकर, मंदार लुडबे, ललित चव्हाण, अवि सामंत, रवींद्र खानविलकर, हेमंत बांदेकर, वैभव सावंत, गणेश साळगावकर दत्ता चोपडेकर, अपर्णा धुरी, निलेश सामंत, राजू बिडये, ताता बिलये, जिजी गावडे यासह अन्य उपस्थित होते. किनारपट्टी गावांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्या राज्य शासनाकडे मांडल्यानंतर त्याबाबत शासन स्तरावरून मोठा निधी मंजूर करण्यात आल्याचे ते म्हणाले.