आ. वैभव नाईक यांच्यामुळेच देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथच्या वीजेचा प्रश्न गंभीर

विजय केनवडेकर यांचा आरोप ; आमदारकीच्या ९ वर्षात किती ट्रान्सफॉर्मर मंजूर करून आणला ते जाहीर करण्याचे आव्हान

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून शहरासह किनारपट्टी वरील गावांचा विजेचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही

मालवण | कुणाल मांजरेकर

देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथ येथील वीजेचा प्रश्न आज गंभीर बनला आहे. सुरळीत वीज पुरवठ्या साठी येथील ग्रामस्थांना आंदोलने करावी लागत असून याच आंदोलनातून देवबाग ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या संपूर्ण प्रकाराला ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या आजवरच्या ९ वर्षाच्या काळात ८ वर्षे ते सत्ताधारी आमदार होते. मागील अडीच वर्षे तर त्यांचे उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते. मग या नऊ वर्षात विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी किती ट्रान्सफॉर्मर मंजूर करून आणलात ते वैभव नाईक यांनी जाहीर करावे, असे आव्हान श्री. केनवडेकर यांनी दिले आहे. किनारपट्टी गावांसह मालवण शहरातही विजेचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी भाजपा नेते निलेश राणे यांनी चर्चा केली असून भाजपाच्या माध्यमातून शहरासह किनारपट्टी वरील गावांचा विजेचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे ते म्हणाले.

मालवण येथील भाजपा कार्यालयात शनिवारी श्री. केनवडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, आबा हडकर, के. पी. चव्हाण, महेश गांवकर, मंदार लुडबे, ललित चव्हाण, अवि सामंत, रवींद्र खानविलकर, हेमंत बांदेकर, वैभव सावंत, गणेश साळगावकर दत्ता चोपडेकर, अपर्णा धुरी, निलेश सामंत, राजू बिडये, ताता बिलये, जिजी गावडे यासह अन्य उपस्थित होते. यावेळी श्री. केनवडेकर म्हणाले, देवबाग ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून देवबाग गावातील विजेच्या ट्रान्सफॉर्मरसाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार शुक्रवारी आम्ही ओरोस मध्ये जाऊन पालकमंत्र्यांचे ओएसडी श्री. साखरे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधण्यात आला.

भाजपने वाचला आ. वैभव नाईकांच्या अपयशाचा पाढा

देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथ गावात ९ ट्रान्सफॉर्मर असून त्यांची क्षमता वाढवण्याची मागणी मागील चार वर्षांपासुन प्रलंबीत आहे. मागील आठ महिने भाजपची सत्ता आहे. यापूर्वी सत्तेत कोण होते. किनारपट्टी वरील ८ कोटी ८७ लाखांची महावितरणची कामे प्रलंबीत असतील तर हे आमदाराचे अपयश नाही का ? उद्धव ठाकरे यांच्याकडून निधी आणण्यात ते अपयशी का ठरले ? आमदार स्वतः जिल्हा नियोजनचे सदस्य असतात. मग निधीसाठी त्यांनी जिल्हा नियोजन कडे मागणी का केली नाही ? रत्नसिंधू योजनेतून ट्रान्सफॉर्मरसाठी निधी का उपलब्ध करून दिला नाही ? मागील ९ वर्ष फक्त खोटं बोला पण रेटून बोला या पद्धतीने आमदारांचे काम सुरु आहे. केंद्र सरकारच्या दिनदयाळ योजनेत आमदारांनी मागणी केली असती तर हे सगळे ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले असते. तोक्ते वादळावेळी किनारपट्टी वरील सर्व विद्युत यंत्रणा सक्षम करण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र त्याकडेही त्यानी दुर्लक्ष केले. आमदारकीच्या काळात वैभव नाईक यांनी केवळ तीन ट्रान्सफॉर्मर साठी शिफारसपत्रे दिली, त्यातील दोन शिफारस पत्रे खासगी हॉटेलच्या ट्रान्सफॉर्मर साठी होती. याचे पुरावे आमच्याकडे असून वेळ पडल्यास दूध का दूध पानी का पानी करण्यास आम्ही तयार आहोत, असे विजय केनवडेकर म्हणाले.

पं. स. मध्ये नौटंकी करण्यापेक्षा अधिवेशनात करा : धोंडू चिंदरकर

मालवण तालुक्यातील शिक्षकांच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी पं.स.च्या आवारात ठिय्या आंदोलनाची नौटंकी केली. मात्र एवढाच दम असेल तर ज्या विधी मंडळाचे तुम्ही सदस्य आहात, त्या विधिमंडळाच्या अधिवेशनात् जाऊन ही नौटंकी करा, असे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर म्हणाले. तर जनतेच्या प्रश्नाना सामोरे जाण्याची हिंमत नसल्याने वैभव नाईक हे आमसभा लावण्यास टाळाटाळ करीत असून या नऊ वर्षात केवळ एकदाच त्यांनी आमसभा लावल्याचे विजय केनवडेकर म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!