देवबाग ग्रामस्थांच्या आंदोलनाचा वाद चिघळला ; सुमारे १०० ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप : आरोपींमध्ये सरपंचांसह प्रमुख ८ जणांचा समावेश

गुन्हे दाखल होताच ग्रामस्थ अधिक आक्रमक ; पोलीस ठाण्या समोर ग्रामस्थांचा मोठा जमाव

मनसे सरचिटणीस, माजी आ. परशुराम उपरकर, भाजपा नेते दत्ता सामंत यांची पोलीस ठाण्याला भेट

मालवण | कुणाल मांजरेकर

महावितरणच्या मालवण कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करून बाहेर काढत त्यांच्या अंगावर जात कार्यालयाला टाळे ठोकल्या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह शंभर जणांवर शासकीय कामात अडथळे आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रमुख आठ जणांच्या नावांचा समावेश आहे. या घटनेमुळे ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले असून येथील पोलीस ठाण्या समोर मोठा जमाव निर्माण झाला आहे. यामुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गणेश संभाजी साखरे यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, भाजपा नेते दत्ता सामंत यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन ग्रामस्थ आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली

देवबाग गावातील वीज वितरणामधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी सरपंच उल्हास तांडेल यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पुकारलेल्या आंदोलनात अधिकारी जागेवर नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळे ठोकले. यानंतर याठिकाणी उपस्थित झालेल्या उप कार्यकारी अभियंता साखरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत ग्रामस्थ आणी महिलांनी त्यांना भर उन्हात थांबवत धारेवर धरले. या प्रकरणी श्री. साखरे यांच्या तक्रारी नंतर पोलिसांनी देवबाग सरपंच उल्हास तांडेल, भालचंद्र उर्फ अवी विलास सामंत, विकास विलास ताम्हणकर, पंकज गणपत धुरी, मनोज मोरेश्वर खोबरेकर, सहदेव दुलाजी साळगावकर, राम चोपडेकर (सर्व रा. देवबाग), मिलिंद झाड ( रा. वायरी भूतनाथ) या आठ जणांसह अन्य १०० महिला व पुरुषांवर गुन्हे दाखल केले आहेत. या आंदोलकांनी मंगळवारी १३ जुन रोजी सकाळी ११ वाजता गैरकायदा जमाव करून गावातील विजेचा प्रश्न तात्काळ मिटवा असे सांगून कार्यालयात प्रवेश करीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांना धाकधपटशाहीने कार्यालयाला कुलूप ठोकत कार्यालयीन कामकाज जबरदस्तीने बंद पाडून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक विजय यादव करीत आहेत.

ग्रामस्थ आक्रमक ; राजकीय नेतेमंडळी पोलीस ठाण्यात दाखल

देवबाग ग्रामस्थांवर गुन्हे दाखल होताच ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत. सकाळीच मोठ्या संख्येने ग्रामस्थ पोलीस ठाण्याच्या आवारात दाखल झाले. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, भाजपा नेते दत्ता सामंत यांनी पोलीस ठाण्यात दाखल होऊन पोलीस अधिकारी आणी ग्रामस्थांशी चर्चा केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!