चिवला बीच येथील मत्स्यव्यवसायच्या इमारतीत मद्यधुंद युवकांचा हैदोस ; इमारतीच्या काचा फोडल्या…
संतप्त नागरिकांकडून संबंधिताना “प्रसाद” ; मत्स्यव्यवसाय आयुक्तांशी चर्चा, गुन्हा दाखल करण्याची मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
शहरातील धुरीवाडा चिवला बीच येथे मच्छीमारांच्या सुविधेसाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने अलीकडेच लाखो रुपये खर्चून स्वच्छतागृहाची इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत काही मद्यधुंद युवकांनी हैदोस घातल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या युवकांनी येथे दारू पिताना इमारतीच्या काचा फोडून नुकसान केले आहे. सकाळी ही घटना निदर्शनास येताच स्थानिक नागरिक आक्रमक झाले. त्यांनी या युवकांचा शोध घेऊन त्यांना चांगलाच प्रसाद दिला आहे. दरम्यान, शासकीय इमारतीत दारू पिऊन शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडे दूरध्वनी वरून केली आहे. यापुढे देखील या परिसरात असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
धुरीवाडा चिवला बीच येथे मच्छीमार विकास निधी अंतर्गत अत्याधुनिक सर्व सोयीयुक्त अंदाजे रक्कम साडेआठ लाख रुपये खर्चून स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान काही मद्यधुंद युवकांनी येथे दारू पार्टी करताना आतील काचा फोडून नुकसान केले. सकाळी 6 वाजता ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आली. यावेळी नागरिक आक्रमक झाले. त्यांनी या युवकांचा शोध घेऊन त्यांना चांगलाच प्रसाद दिला.