देवबाग ग्रामस्थ वीज वितरणच्या कार्यालयात दाखल ; अधिकाऱ्यांनी काढला पळ ?
अधिकारी दाखल होईपर्यंत कार्यालय सोडणार नाही ; तोपर्यंत काम बंद ठेवा ; सरपंच उल्हास तांडेल यांची आक्रमक भूमिका
महिलांचा लक्षणीय सहभाग ; वीज वितरण कार्यालयाला पोलीस छावणीचे रूप
मालवण | कुणाल मांजरेकर
पर्यटन गाव असलेल्या देवबाग गावात मागील 70 दिवस विजेची समस्या गंभीर बनली आहे. मात्र याकडे वीज वितरणचे दुर्लक्ष होत असल्याने आक्रमक ग्रामस्थांनी मंगळवारी येथील वीज कार्यलयाला धडक दिली. मात्र ग्रामस्थांनी पूर्वकल्पना देऊनही वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थ येणार असल्याचे माहित असूनही अधिकाऱ्यांनी कार्यालयातून पळ काढल्याचा आरोप करीत जोपर्यंत अधिकारी दाखल होत नाहीत, तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही. आणी अधिकारी दाखल होईपर्यंत कार्यालयाचे कामकाज देखील बंद ठेवा, अशी आक्रमक भूमिका सरपंच उल्हास तांडेल यांनी घेतली आहे. ग्रामस्थांच्या पूर्वनियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कार्यालयात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पर्यटन गाव असलेल्या देवबाग मध्ये वीज पुरवठ्याबाबत अनेक समस्यांचे निर्माण झाल्या असून याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार कळवून देखील समस्यांचे निवारण होत नसल्याने देवबाग ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. देवबाग गावात गेले दोन महिने विजेचा खेळखंडोबा सुरु असून विजेचा दाब कमी जास्त होणे, वीज वाहिन्या तुटणे यासह अन्य वीज समस्या निर्माण होत आहे. वीज समस्या सोडविण्यासाठी व सेवा देण्यास वीज वितरण कंपनी कार्यक्षम नाही असा आरोप उल्हास तांडेल यांनी केला आहे. याबाबत मंगळवारी वीज अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा सरपंच उल्हास तांडेल यांनी दिला होता. मात्र मंगळवारी वीज वितरणचे सहाय्यक अभियंता साखरे हे कामानिमित्त बाहेर गेल्याचे सांगण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वीज कार्यालयातील पंखे बंद करण्यास ग्रामस्थांनी भाग पाडत जोपर्यंत अधिकारी येत नाहीत, तोपर्यत कार्यालयाचे काम बंद पाडले आहे. आमच्यावर खुशाल गुन्हे दाखल करा, मात्र अधिकारी येऊन आमच्या समस्यांचे निराकरण झाल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही, अशी भूमीका ग्रामस्थांनी घेतली आहे. वायरी आणि तारकर्ली ग्रामस्थ देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.