एमआयटीएम कॉलेजमध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया केंद्र सुरु
प्राचार्य सूर्यकांत नवले यांची माहिती ; शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही केंद्र सुरू रहाणार
मालवण | कुणाल मांजरेकर
दहावी- बारावीचे निकाल नुकतेच लागले आहेत. त्या पाठोपाठ सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी प्रवेशासाठी धावपळ सुरु झाली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सिंधुदुर्गनगरी नजीकच्या एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे.
जयवंती बाबू फाउंडेशन संचालित एम. आय. टी. एम. इंजिनियरिंग कॉलेज हे जिल्ह्यातील नावाजलेले अभियांत्रिकी महाविद्यालय असून येथे पदवी आणि पदविका अभ्यासक्रम शिकवले जातात. तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्रशस्त मैदान अशी या कॉलेजची वैशिष्ट्य असून दरवर्षी उज्ज्वल निकालाची परांपरा ही एम.आय.टी.एम कॉलजची खास ओळख आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थी वर्गाची होणारी गर्दी लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी येथे पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी देखील सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत हे केंद्र सुरू असून प्रवेशासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एम.आय.टी.एम. कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी केले आहे.