लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसपा स्वबळावर ; कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

बसपाचे महाराष्ट्र प्रभारी आणि ओबीसी नेते भीमजी राजभर यांची ओरोस येथील कार्यकर्ता बैठकीत आवाहन

सिंधुदुर्ग : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढणार आहे. तरी कार्यकर्त्यांनी बुथ सेक्टर बांधणी करावी, असे आवाहन बसपाचे महाराष्ट्र प्रभारी आणि ओबीसी नेते भीमजी राजभर यांनी ओरोस येथील कार्यकर्ता बैठकीत केले.

बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्गची बैठक बुधवारी ओरोस शासकीय विश्रामगृह बैठक संपन्न झाली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बसपाचे महाराष्ट्र प्रभारी भीम राजभर बोलत होते. ते पुढे म्हणाले राज्यात दलित, आदिवासी समाजावरील अत्याचार वाढले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक हे प्रस्थापितांच्या बाजूने आहेत. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाला मजबूतपणे समाजाने साथ दिली पाहिजे.

यावेळी प्रदेश अध्यक्ष ऍड. संदीप ताजने म्हणाले, आपण स्वतःला आंबेडकरवादी समजतो. परंतु काम मनुवादी पक्षाचे करतो. हे थांबवा, हे मनुवादी पक्ष आपला वापर करतात. यासाठी बहेन कुमारी मायावती यांचे हात बळकट करण्यासाठी एक नेता, नीळा झेंडा आणि हत्ती निशाणी शिवाय अन्य पर्याय नाही. यासाठी प्रत्येक घरात हा संदेश पोहचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा असे आवाहन केले.

यावेळी प्रदेश महासचिव राजेंद्र आयरे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पी. के. चौकेकर, जिल्हा प्रभारी रवींद्र कसालकर, सुधाकर माणगावकर, संजय धारपवार, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा महासचिव आनंद धमापूरकर यांनी केले. तर रंजन तांबे यांनी आभार मानले

बैठकीत जिल्हा उपाध्यक्षपदी उदय कदम, माणगाव, ता. कुडाळ तर जिल्हा सचिव म्हणून रंजन तांबे यांची नियुक्ती करण्यात आली.

बैठकीला जिल्हा कोषाध्यक्ष नरेंद्र पेंडूरकर, जिल्हा सचिव रंजन तांबे, विजय साळकर, दुलाजी चौकेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!