“एमआयटीएम” च्या मॉक सीईटी मध्ये टोपीवालाचा श्याम शांतीलाल पटेल प्रथम
पणदूरचा अथर्व सतीश मुंज आणि कुडाळची दुर्वा दर्शन बांदेकर अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी
मालवण | कुणाल मांजरेकर
मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंट अभियंत्रिकी महाविद्यालय सुकळवाड यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य भागातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचा सराव होऊन त्याची गुणवत्ता वाढ होण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून घेण्यात आलेल्या मॉक सीईटी २०२३ मध्ये टोपीवाला ज्युनियर कॉलेज मालवणचा विद्यार्थी श्याम शांतीलाल पटेल याने १८३ स्कोर मिळवित प्रथम क्रमांक मिळवला. तर ज्युनियर कॉलेज पणदूरच्या अथर्व सतीश मुंज (१७३) आणि कुडाळ ज्युनियर कॉलेजच्या दुर्वा दर्शन बांदेकर (१७२) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.
एम.आय.टी.एमच्या वतीने दरवर्षी MHT – CET साठी सराव परीक्षा घेतली जाते. यावर्षी ही परीक्षा चार टप्प्यात घेण्यात आली. अंतिम मॉक टेस्ट २७ एप्रिलला घेण्यात आली. ३०० विद्यार्थी या परीक्षेकरिता बसले होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, प्राचार्य सूर्यकांत नवले, अकॅडमीक डीन पूनम कदम, परीक्षा विभाग डीन विशाल कुशे यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी आलेल्या पालकांनी सी.ई.टी. सराव परीक्षा आयोजित केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. आमच्या मुलाना याचा नक्कीच फायदा होईल असा आशावाद व्यक्त करीत संस्थेने असेच उपक्रम राबवावेत जेणेकरून जिल्हयातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे सुचविले.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी दुर्वा बांदेकर या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये तिने सी.ई.टी. संदर्भात एम.आय.टी.एम. कॉलेजकडून करण्यात आलेली मदत व मार्गदर्शन याचा उल्लेख करत कॉलेजचे सर्वांतर्फे आभार मानले. ही परीक्षा यशस्वी पार पडण्याकरिता अकॅडमीक डीन पूनम कदम, ऍडमिनिस्टर ऑफिसर राकेश पाल, प्रा. सुकन्या सावंत, प्रा. योगेश वालावलकर, प्रा. सिद्धेश शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.