मी भाजपातच ! ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी फसवून कणकवलीला नेले….
बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांचे स्पष्टीकरण
कणकवलीतील “त्या” प्रकारानंतर सरपंच ग्रामस्थांसमवेत भाजपा कार्यालयात दाखल ; ठाकरे गटाने त्रास दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपा प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काल भाजपात प्रवेश करणाऱ्या बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांनी आज सकाळी कणकवलीत आमदार वैभव नाईक यांची भेट घेत कालचा भाजपा प्रवेश खोटा असून आपण शिवसेना ठाकरे गटातच असल्याचे म्हटले होते. मात्र सायंकाळी श्री. पानवलकर यांनी मालवणच्या भाजपा कार्यालयात दाखल होत आपण भाजपातच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मला फसवून कणकवलीला नेले होते, असा आरोप करीत गावच्या विकासासाठी आपण भाजपात आल्याचे स्पष्ट करीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्रास दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
आपण रिक्षा व्यवसायिक आहोत. आपल्याला कणकवलीला भाडे आहे असे सांगून कणकवलीला नेण्यात आले आणि तेथे फसवून आपला प्रवेश घेत कालचा भाजपा मधील प्रवेश खोटा असल्याचे बोलण्यास भाग पाडले असा आरोप सरपंच पानवलकर यांनी केला आहे. यापूढे गावच्या विकासासाठी आपण भाजपातच राहणार आहोत. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाहक त्रास दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, संतोष गावकर, संतोष कोदे, दीपक सुर्वे, मंगेश गावकर, भानुदास येरम, अनिल येरम, उल्केश येरम, प्रकाश पाताडे, विश्वास हिर्लेकर, गुरूदास घाडी आदी उपस्थित होते.