आ. वैभव नाईकांकडून रेवंडी ग्रामस्थांची फसवणूक…
भद्रकाली मंदिर ते कोळंब रस्ता डांबरीकरण व मजबूतीकरण कामाची अद्याप वर्कऑर्डर नाही, तांत्रिक मान्यताही नाही
पालकमंत्र्यांच्या शिफारशीने तसेच निलेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर : विजय केनवडेकर यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
आमदार वैभव नाईक यांच्याकडून रेवंडी ग्रामस्थांची फसवणूक झाल्याचा आरोप भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी केला आहे. भद्रकाली मंदिर ते कोळंब रस्ता डांबरीकरण व मजबूतीकरण करण्याच्या कामाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीने तसेच माजी खासदार निलेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्याप या कामाची वर्कऑर्डर निघालेली नाही तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून तांत्रिक मान्यताही देण्यात आलेली नाही. असे असताना या कामाचा दर्जा कसा राहणार याची कोणतीही मान्यता न घेता फुकाचे श्रेय घेण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी या रस्त्याचे भूमिपूजन केले आहे, असा आरोप भाजपचे शहर प्रभारी विजय केनावडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
रेवंडी येथील या रस्त्याचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले होते. याबाबत श्री. केनवडेकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. रेवंडी भद्रकाली मंदिर ते कोळंब रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खास शिफारशीनुसार व निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे २०२३ च्या जिल्हा नियोजन निधी मधून मंजूर करून घेण्यात आला होता. मात्र या रस्त्याचे फुकाचे श्रेय घेण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी भूमिपूजन करून रेवंडी गावच्या रहिवाशांचे फसवणूक केलेली आहे. या कामाची वर्क ऑर्डर अजून आलेली नसून यासंबंधी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून अजूनही टेक्निकल मंजुरी घेतलेली नाही. असे असताना रस्त्याचा कोणता दर्जा राहणार, कशाप्रकारे राहणार यासंबंधी कोणतीही माहिती न घेता श्रेयासाठी हे भूमिपूजन केलेले आहे. यासंबंधी तांत्रिक मंजुरी २३ मे २०२३ रोजी जिल्हा परिषद विशेष सभेमध्ये रस्त्याचे डांबरीकरण हा विषय आहे. मंजुरीनंतर निविदा निघणार आहे. त्यानंतर या कामाची वर्क ऑर्डर काढण्यात येणार आहे. प्रशासकिय प्रक्रिया पूर्ण न होता ठेकेदारांना हाताशी धरून व जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दमदाटी करून कामाचा शुभारंभ करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार करत आहेत. यासंबंधी पूर्ण माहिती भाजपा कडे असून या कामासंदर्भात रस्त्याची ज्या प्रकारे तांत्रीक मंजुरी कशा प्रकारे देणार आहेत व पाण्याच्या निचरासाठी गटाराची व्यवस्था करणार की नाही, यासंबंधी तांत्रिक मंजुरी नसल्यास या कामात लेखी स्वरूपात भारतीय जनता पार्टी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच जिल्हा परिषद मुख्याधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित अधिकारी खोटी माहिती देऊन जनतेची फसवणूक करत आहेत याची लेखी तक्रार देणार आहे. या रस्त्यावर अनधिकृत पणे टाकलेली खडी ही शासनाने जमा करून घ्यावी अशा प्रकारची लेखी तक्रार करण्यात येणार आहे.
रेवंडीचा रस्ता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मार्फत करून देण्याचे अभिवचन रेवंडी वासियांना दिले होते. त्यानुसारच हा निधी माजी खासदार निलेश राणे यांच्यामार्फत मंजूर करून घेण्यात आला आहे. या रस्त्याचे मंजुरीचे पालकमंत्री यांनी शेरा मारलेले पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर केलेल्या कामाचा पाठपुरावा याची पण पत्रे आमच्याकडे आहेत .असे असताना तीन वर्षे सत्तेत असताना पण रस्त्याचे खड्डे बुजवू न शकलेले आमदार फुकाचे श्रेय घेण्यासाठी भूमिपूजन करतात ही जनतेची फसवणूक करत आहेत. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आंगणेवाडी येथील रस्ते ज्याप्रमाणे दर्जेदार करण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे दर्जेदार रस्ता रेवंडी वासियांना मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न भाजपा करत आहे. श्री भद्रकाली मंदिरात बरेच भाविक जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून पालकमंत्री यांनी विशेष मंजुरी रस्त्याला दिली आहे. त्याचबरोबर रेवंडी येथील कांबळी यांच्या घरा नजिकचा रस्ता, गणेश घाट अशी तीन विकास कामे भाजपाने विशेष मंजुरी घेतली आहे. तसेच शेलटी रेवंडी भद्रकाली मंदिर मार्गे कोळंब हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये घेण्यासाठी माजी खासदार निलेश राणे विशेष प्रयत्न करत आहेत यासंबंधी त्या खात्याकडे पाठपुरावा पालकमंत्र्यांमार्फत सुरू आहे, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.