… अन् बॉम्ब सदृश्य वस्तू घेऊन मालवण बंदरात येऊ पाहणारे गस्तीनौकेच्या जाळ्यात !
मालवण : सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणेच्या वतीने येथील समुद्रात सागर सुरक्षा कवच मोहीम घेण्यात आली. या सागर कवच अभियानांतर्गत येथील समुद्रातील सागर सुरक्षा कवच भेदून बाँब सदृश वस्तू घेत मालवण बंदरात घुसू पाहणाऱ्या रेड टीमला अप्सरा स्पीडनौकेवरील ब्ल्यू टीमने किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या समुद्रात पकडले. त्यांना मालवण बंदरात आणून मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे मालवणची सागरी सुरक्षा अभेद्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्याच्या सागरी हद्दीत कालपासून सागरी कवच अभियानास सुरवात झाली. कालच्या पहिल्याच दिवशी देवगडच्या समुद्रात ब्ल्यू टीमने रेड टीमला पकडण्याची कार्यवाही केली. आजच्या दुसऱ्या दिवशीही पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या नेतृत्वाखाली सागरी पोलिस, सागर सुरक्षा दलाचे सदस्य, सागर सुरक्षा रक्षक यांच्या माध्यमातून येथील समुद्रात कडक गस्त घालण्यात येत होती. यात दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान किल्ले सिंधुदुर्ग लगतच्या समुद्रात १५ वाव खोल समुद्रात एक नौका मालवणच्या बंदरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे अप्सरा नौकेस दिसून आले. त्यांच्या दिशेने जात असता त्या नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अप्सरा नौकेने त्या नौकेला पकडत त्या नौकेची तपासणी केली असता ती शीतल गस्तीनौका असल्याचे दिसून आले. नौकेची तपासणी केली असता त्या नौकेवर मालक लक्ष्मण भगत, तांडेल रामदास डोर्लेकर (रत्नागिरी), निवती पोलीस कर्मचारी एम. बी. नाईक, वेंगुर्ले पोलीस कर्मचारी जी. जी. परब, प्रधान नाईक रत्नागिरी पंकज कुमार हे रेड टीमचे सदस्य आढळले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी रेड टीमचे सदस्य असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे बाँब सदृश वस्तू होती. ही वस्तू ते किल्ले सिंधुदुर्ग, रॉकगार्डन, एमटीडीसी तारकर्ली येथे ठेवण्याचे त्यांचे मनसुबे होते. त्यामुळे ब्ल्यू टीमने ही वस्तू ताब्यात घेतली. ब्ल्यू टीममध्ये सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे, राजेंद्र दळवी, हुसेन शेख, एम के. भोई,
सुशांत पवार यांचा समावेश होता. रेड टीमच्या सदस्यांना त्यांनी ताब्यात घेत येथील पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू होती. दरम्यान या कारवाईमुळे मालवणची सागरी सुरक्षा अभेद्य असल्याचे सिद्ध झाले आहे.