मालवणात गाबीत एकजुटीचा जागर ; भव्य शोभायात्रेने गाबीत महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

मोटरसायकल रॅलीत हजारोंच्या संख्येने गाबीत समाज बांधव सहभागी ; महिलांचाही लक्षणीय सहभाग

मालवण | कुणाल मांजरेकर

कोकण किनारपट्टीवरील पहिल्या वहिल्या गाबीत महोत्सवाला आजपासून मालवणात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने मालवणात काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारोंच्या संख्येने गाबीत समाज बांधव आणि भगिनी या रॅलीत सहभागी झाल्याने गाबीत शक्तीचा जागर यानिमित्ताने पाहायला मिळाला. गाबीत समाजाचा निळा झेंडा फडकावीत आणि “गाबीत एकजुटीचा विजय असो” अशा गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. ३० एप्रिल पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवामुळे गाबीत समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

विखूरलेल्या गाबीत समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, महाराष्ट्र राज्य गाबीत समाज व सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज यांच्या वतीने मालवणच्या दांडी समुद्र किनाऱ्यावर आजपासून गाबीत महोत्सव आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या शुभारंभा निमित्त आज सायंकाळी मालवण शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. देऊळवाडा येथून भरड मार्गे बाजारपेठ- फोवकांडा पिंपळ पुन्हा भरड येथून वायरी गर्देरोड मार्गे ही रॅली मोरयाचा धोंडा येथे पोहचली. या रॅलीत गाबीत झेंडे फडकवीत मालवणसह वेंगुर्ला, देवगड येथील गाबीत बांधव सहभागी झाले होते. ऐतिहासिक मोरयाचा धोंडा येथे ढोल ताशांच्या गजरात गणेश पूजन करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ला उभारणीच्या वेळी याच मोरयाचा धोंड्याचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची पायाभरणी केली होती. इतिहासातील हाच प्रसंग उभा करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील भार्गव खराडे याच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. यावेळी मावळ्यांची वेशभूषा केलेले गाबीत बांधवही सहभागी झाले होते. यावेळी गाबीत महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम उपरकर यांच्यासह अन्य मान्यवरांनीही पूजन केले. पौराहित्य रविकिरण आपटे यांनी केले.

या पूजनानंतर मोरयाचा धोंडा येथून दांडेश्वर मंदिर अशी किनाऱ्यावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, जय गाबीतच्या घोषणा देत आणि मशाली पेटवत काढलेली ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली. तर याच वेळी समुद्रातून सजवलेल्या आणि मशाल लावलेल्या होड्यांची देखील मिरवणूक काढण्यात आली. ही रॅली दांडेश्वर मंदिर येथे महोत्सव ठिकाणी आल्यावर गाबीत ज्योत प्रज्वलीत करून महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, राज्य अध्यक्ष सुजय धुरत, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, जिल्हा सचिव महेंद्र पराडकर, स्थानिक समिती अध्यक्ष अन्वय प्रभू, रविकिरण तोरसकर, हरी खोबरेकर, सौरभ ताम्हणकर, दिलीप घारे, बाबा मोंडकर, संमेश परब, अशोक तोडणकर, सुदेश आचरेकर, पूजा सरकारे, सेजल परब, सुरवी लोणे, दिक्षा ढोके, माधुरी प्रभू, अन्वेषा आचरेकर, मेघा गावकर, राजा गावकर, संजय केळूसकर मेघनाद धुरी, पांडुरंग कोचरेकर, रश्मीन रोगे, रुपेश प्रभू, नरेश हुले, देवगड अध्यक्ष संजय पराडकर, लक्ष्मण तारी, लक्ष्मीकांत खोबरेकर आदी व इतर समाज बांधव सहभागी झाले होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3594

Leave a Reply

error: Content is protected !!