बारसू परिसरातील मीडियाच्या कॅमेऱ्यामुळे स्टंटबाजीसाठीच विनायक राऊत आंदोलनकर्त्यांच्या भेटीला !

निलेश राणेंची टीका ; उद्धव ठाकरे नेमकी कुठची शिवसेना आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभी करणार ?

मालवण | कुणाल मांजरेकर

ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी बारसू रिफायनरी परिसराला भेट देऊन प्रकल्प विरोधी ग्रामस्थांची भेट घेतली होती. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना उभी करणार असल्याची ग्वाही दिल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले होते. या दौऱ्याचा भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे. मागील अनेक दिवस येथील काही ग्रामस्थ प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. पण विनायक राऊत यांना कधी येथे जाऊन त्यांची भेट घ्यावी वाटली नाही. पण आता मीडियाचे कॅमेरे येथे असल्यानेच त्यांनी याठिकाणचा दौरा केला. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण शिवसेना आंदोलकांच्या पाठी उभी करण्याचा शब्द दिला आहे. पण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे कुठे ? ज्यांच्याकडे नाव नाही, पक्ष नाही, चिन्ह नाही, ते आंदोलकांच्या पाठीशी कुठला पक्ष उभा करणार ? असा सवाल निलेश राणेनी उपस्थित केला आहे. रिफायनरीविरोधात लोकांना भडकविण्याचा उद्धव ठाकरे, विनायक राऊत यांचा डाव आम्ही सफल होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बारसू गावामध्ये प्रस्तावित रिफायनरीसाठी माती परीक्षण सुरु आहे. मात्र या माती परीक्षणालाही काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या ग्रामस्थांना समजावण्याचे काम प्रशासन करत असतानाच आज खा. विनायक राऊत यांनी आंदोलकांची भेट घेतली. या भेटीची माजी खासदार निलेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. केवळ प्रसिद्धीच्या स्टंटसाठी खा. राऊत यांनी या आंदोलकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राऊत यांनी आंदोलकांना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचे दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. यावरही निलेश राणे यांनी टीका केली आहे. माझी अख्खी शिवसेना तुमच्या पाठीशी उभी करतो सांगणाऱ्या ठाकरेंच्या पाठीशी नेमकी किती शिवसेना उरली आहे असा सवाल करत ज्यांच्याकडे नाव नाही, चिन्ह नाही , पक्ष नाही ते आंदोलकांच्या पाठीशी नेमका कोणता पक्ष उभा करणार असा असा सवाल केला आहे. बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीच्या माती परीक्षणाचे काम होत असताना प्रशासन आंदोलकांना समजावण्याचे काम करत आहे. त्यावेळी आग लावण्याचे, जनतेला भडकविण्याचे काम विनायक राऊत करत आहेत असा थेट आरोप निलेश राणे यांनी केला आहे. येथे अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र पालकमंत्री, प्रशासन ग्रामस्थांना समजाविण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यातून हा प्रकल्प उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असून त्याला लवकरात लवकर दिशा मिळेल असेही निलेश राणे म्हणाले. विनायक राऊत यांच्या कोणत्याच प्रयत्नांना आम्ही यश येऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!