दांडी किनारपट्टीवर उद्यापासून गाबीत महोत्सवाची धूम ; महोत्सवाच्या निमित्ताने गाबीत समाज प्रथमच येणार एकत्र
३० एप्रिल पर्यंत आयोजन ; महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक मधील गाबीत समाज बांधव होणार सहभागी
महोत्सव गाबीत समाजाला दिशादर्शक ठरेल ; अ. भा. गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांचा विश्वास
मालवण : अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, महाराष्ट्र राज्य गाबीत समाज व सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज यांच्या वतीने मालवणच्या दांडी समुद्र किनाऱ्यावर उद्या २७ एप्रिल पासून चार दिवसीय गाबीत महोत्सव होत आहे. या महोत्सवात महाराष्ट्र, गोवा कर्नाटक या तीन राज्यातून गाबीत बांधव सहभागी होणार असून विविध स्पर्धा व कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात आहे. हा महोत्सव केवळ मनोरंजनात्मक न राहता महोत्सवातून गाबीत बांधवाना एकत्र आणतानाच व्यवसाय उद्योग व नोकरीच्या संधीबाबत मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे हा महोत्सव गाबीत समाजाला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
मालवण येथील गाबीत महोत्सव कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत परशुराम उपरकर हे बोलत होते. यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, मुंबई चे अध्यक्ष परशुराम उपरकर, गाबीत समाज महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत, गाबीत समाज सिंधुदुर्ग अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सिंधुदुर्ग कार्याध्यक्ष बाबा मोंडकर, सिंधुदुर्ग जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, दिगंबर गांवकर, संजय बांदेकर, अशोक तोडणकर, प्रवीण सरवणकर, प्रविणा सरवणकर, पूजा सरकारे, अन्वय प्रभू, रुपेश प्रभू, संमेश परब, नरेश हुले, लक्ष्मीकांत खोबरेकर, जितेंद्र शिर्सेकर यासह अन्य पदाधिकारी गाबीत समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, गाबीत महोत्सवानिमित्त गाबीत बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २७ एप्रिल रोजी गाबीत बांधव मच्छिमारी, मत्स्य विक्री व वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय बंद ठेवून या महोत्सवाच्या शुभारंभात सहभागी होणार आहेत. २७ रोजी सकाळी १० वा. मामा वरेरकर नाट्यगृह येथे रांगोळी स्पर्धा, होणार आहे. तर सायंकाळी ५ वा. फोवकांडा पिंपळ येथून मोटारसायकल रॅली निघणार आहे. ५.३० वाजता मोरयाचा धोंडा येथून श्री देव दांडेश्वरपर्यंत भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाजांच्या भुमिकेतील कलाकार आणि मावळे असा ऐतिहासिक सोहळा साकारला जाणार आहे. याच वेळी समुद्रातून सजावट केलेल्या आणि मशाली व झेंडे लावलेल्या नौकांची मिरवणूकही निघणार आहे. सायंकाळी ६ वा. दांडी येथे महोत्सवाच्या ठिकाणी या नौकांचे स्वागत झाल्यावर गाबीत महाज्योतीचे प्रज्वलन व गाबीत महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. ६.३० वा. गाबीत भूषण पुरस्कार प्रदान सोहळा व गाबीत सन्मान सत्कार कार्यक्रम, क्रिकेट स्पर्धा व होडी सजावट स्पर्धा बक्षीस वितरण होणार आहे. रात्री ८ वा. इतिहास संशोधक अमर आडके यांचे गाबीत समाज व शिवकाल संबधी भाषण, रात्री ९ वा. गाबीत समाजाचा शिमगोत्सव सदर होणार आहे. दि. २८ रोजी सकाळी ८.३० वा. दांडी किनारी रापण प्रात्यक्षिक दाखविणे, शेंडी पागून मासे पकडणे स्पर्धा, गरवून मासे पकडणे प्रात्यक्षिक होणार आहे. तर सकाळी १० वा.मामा वरेरकर नाट्यगृह येथे मत्स्य संपदा व सिंधुरत्न योजना, किमान कौशल्य विकास व रोजगार योजना, मत्स्य उद्योग, बँक कर्ज प्रकरणे याबाबत माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. तर दांडी येथे सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत गाबीत समाजाचे जिल्हास्तरीय कार्यक्रम, सागरी सुंदरी स्पर्धा, गाबीत भूषण पुरस्कार व सन्मान प्रदान कार्यक्रम होणार आहे. दि. २९ रोजी सकाळी १० वा. मामा वारेरकर नाट्यगृह येथे पर्यटन, जलक्रीडा, जात पडताळणी, बँक योजना याविषयी मार्गदर्शन तर १२ वा. “मच्छीमार समाज व मानव साधन विकास” या विषयावर प्रा.नंदकिशोर परब यांचे व्याख्यान होणार आहे. तर सायं. ६ ते रात्री ९ या वेळेत दांडी येथे स्थानिक कलाकारांचे गुणदर्शनपर कार्यक्रम, शेंडी पागणे मासेमारी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण, गाबीत भूषण पुरस्कार वितरण व सन्मान, रात्री ९ वा. मुंबईतील सुप्रसिद्ध कलाकारांचा नृत्याविष्कार कार्यक्रम होणार आहे.
दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ८.३० वा. दांडी किनारी नौकनयन व जलतरण स्पर्धा, सकाळी १० वा. गाबीत समाजातील वकील, डॉक्टर्स, इंजिनियर, उच्च शिक्षित आणि उद्योजक यांचा परिसंवाद, दुपारी १२ ते ३ वा. गाबीत महिलांसाठी पाककला स्पर्धा व प्रात्यक्षिके, सायं. ५ ते रात्री ८ वा. दांडी येथे स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम, गाबीत भूषण सन्मान, जलतरण, पाककला स्पर्धा बक्षीस वितरण, रात्री ९ वा. मुंबईतील सुप्रसिद्ध नृत्यांगना, सेलिब्रेटी यांचा ऑर्केस्ट्रा सादर होऊन या महोत्सवाची सांगता होणार आहे.
या महोत्सवासाठी दांडी येथील मुख्य स्टेज मधील व्यासपीठास मच्छिमार नेते कै. ज्ञानेश देऊलकर व्यासपीठ व सभागृहास माजी उपनगरध्यक्ष सुबोध आचरेकर सभागृह, मामा वरेरकर नाट्यगृह सभागृहास कै. अरविंद हुले सभागृह व व्यासपीठास कै. हिरोजी तोडणकर गुरुजी व्यासपीठ अशी नावे देण्यात आली आहेत.
मासेमारी व पर्यटन व्यवसायात कार्यरत असणारा गाबीत समाज या व्यवसायासह इतर उद्योग व्यवसायातही मोठा व्हावा यासाठी परिसंवाद आयोजित करण्यात आले असून ते सर्वांसाठी खुले असणार आहेत. तरी गाबीत समाज बांधव भगिनींसह सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, महाराष्ट्र राज्य गाबीत संघांचे अध्यक्ष सुजय धुरत, सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाजचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी केले.