ठाकरे गटाचं नेमकं चाललंय काय …? बारसू रिफायनरी वरून ठाकरेंच्या नेत्यांमध्येच “मतभेद”

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचा प्रकल्प ग्रस्तांच्या आंदोलनाला पाठींबा ; तर आ. राजन साळवी यांनी खुलेआम घेतली रिफायनरी समर्थनाची भूमिका

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणावरून सध्या कोकणातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी बारसू मध्ये जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलनकर्त्या ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेत शिवसेना ठाकरे गट ग्रामस्थांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, एकीकडे खा. राऊत, आ. नाईक यांनी प्रकल्प विरोधी भूमिका घेत ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठींबा दिला असतानाच दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी ट्विट करून उघडपणे बारसू रिफायनरीला समर्थन दिले आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी वरून ठाकरे गटातच मतभेद असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

बारसू रिफायनरीसाठी मंगळवारी दुपारपासून माती सर्व्हेक्षणाचं काम सुरु करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी सोमवार पासूनच बारसू येथील सड्यावर शेकडो ग्रामस्थ ठिय्या मांडून बसले आहेत. आज त्याठिकाणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके, लोकसभा सह संपर्कप्रमुख सुधीर मोरे, लोकसभा समन्वयक राजेंद्र महाडिक, राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, उपतालुकाप्रमुख तात्या सरवणकर, पं. स. सदस्य प्रकाश गुरव, समन्वयक प्रकाश कुवळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राजन साळवी यांचा रिफायनरीला पाठींबा

एकीकडे ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत, वैभव नाईक यांनी बारसू मध्ये जाऊन प्रकल्पाला विरोध दर्शवला असताना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी उघडपणे या प्रकल्पाला पाठींबा दिला आहे. याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विट मध्ये आ. साळवी म्हणतात, “कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच…. माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी त्यांच्यावर अन्याय करू नये….” राजन साळवी यांच्या या भुमिकेमुळे ठाकरे गटात नेमकं चाललंय काय ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!