वायंगणी ग्रा. पं. मध्ये गैरव्यवहार ? मागील पाच वर्षांच्या कारभाराच्या चौकशीची मागणी
माजी सरपंच मालती जोशी यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन ; पालकमंत्र्यांचेही वेधले लक्ष
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायती मध्ये जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२२ या पाच वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी सरपंच तथा ग्रा. पं. सदस्य मालती जोशी यांनी केला आहे. या ग्रा. पं. च्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी गटविकास अधिकारी मालवण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत पालकमंत्र्यांना देखील देण्यात आली आहे.
मालवणच्या गटविकास अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात मालती जोशी यांनी म्हटले आहे की, मी वायंगणी ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२२ पर्यंत पाच वर्षांच्या कालावधीत बराच गैरव्यवहार झाला आहे. गावचा विकास व्हावा म्हणून शासनाकडून १५ वा वित्त आयोग या योजनेतून भरघोस निधी देण्यात येतो. परंतु या ग्रा. पं. मध्ये या निधीचा वापर मनमानीपणे केला जात आहे. या योजनेमधून ग्रामस्थांना देण्यासाठी डस्टबिन खरेदी केले गेले. त्याची निविदा मागवितांना डस्टबिन व हॅन्डवॉश खरेदी करणे ४०० नग (प्रतिनग १३५ रुपये) अशी निविदा मागविली गेली. त्यासाठी ५४ हजार रुपये बिल अदा करण्यात आले. परंतु डस्टबिनची किंमत बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी करून निधीचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. या ठिकाणी एकूण खरेदी केलेले नग ९२९ आहेत. त्याचप्रमाणे महिला व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यासाठी ६२० नग प्रतिसेट ४२ रुपये प्रमाणे खरेदी करण्यात आले. परंतु त्याची मूळ किंमत ३० रुपये आहे. त्यामुळे बाजार भावापेक्षा जास्त दराने सॅनिटरी पॅड खरेदी केलेले असून ते अतिशय कमी दर्जाचे आहेत.
गरोदर मातांना पोषण आहार पुरवणे ९० किट प्रती किट ३३० रुपये. पहिली ते चौथीच्या मुलांना पोषण आहार पुरवणे २४ पॅकेट प्रति पॅकेट ३३० रुपये असा खर्च करण्यात आला आहे. मार्च २०२१ ला अंगणवाडीसाठी टीव्ही संच खरेदी करण्यात आले. परंतु आजपर्यंत ते अंगणवाडीमध्ये दोन वर्षे झाली तरी पोचलेले नाहीत. शाळेसाठी देण्यात आलेली पाण्याची टाकी मार्च २०२२ मध्ये खरेदी केलेली आहे. परंतु आजपर्यंत ती शाळेमध्ये पाण्याच्या वापरासाठी लावलेली दिसत नाही. सदर खर्च सुद्धा तपासून पहावा. अंगणवाडीसाठी देण्यात आलेले सौर पॅनल यामध्ये सुद्धा गैरव्यवहार झालेला आहे. काही वस्तू कोटेशन प्रमाणे ग्रामपंचायत मध्ये आलेल्या दिसत नाहीत. ग्रामनिधी मध्ये खर्च करताना सुद्धा विषय पत्रिकेवर विषय न ठेवणे, कोटेशन न मागवता काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत (उदाहरणार्थ इलेक्ट्रिक शेगडी) तरी याबाबत योग्य ती चौकशी करून तत्कालीन संबंधितावर अपहाराचा गुन्हा दाखल करावा. याबाबत पंधरा दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास सनदशीर मार्गाने उपोषणास बसण्याचा इशारा मालती जोशी यांनी दिला आहे.