सिंधुदुर्गात लवकरच रेल्वे पार्सल बुकिंग सेंटर सुरु करणार

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ग्वाही

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी, बागायतदार व्यावसायिकांना कोकण रेल्वेच्या माध्यमातून मालाची आवक जावक करण्यासाठी जिल्ह्यातच पार्सल बुकिंग सेंटर सुरु करण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चरच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी आणि बागायत व्यवसायिकांना कोकण रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मालाची आवक जावक करण्यासाठी पार्सल बुकिंग सेंटर फक्त मडगाव आणि रत्नागिरी या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या न परवडण्यासारखे आहे. तसेच याचा आर्थिक बोजा नकळतपणे सिंधुदुर्गातील जनतेवर पडत आहे. याची दखल घेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चरचे कोकण उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर आणि सर्व गव्हर्निंग कौन्सिल मेंबर्स यांनी सदर विषयावर तोडगा काढण्यासाठी चेंबरचे अध्यक्ष ललीत गांधी यांना विनंती केल्याप्रमाणे महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दशरथी यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कर्नाटक दौऱ्यावर असताना भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी रेल्वेचे अधिकृत पार्सल बुकिंग सेंटर सुरू करण्यात यावे असे निवेदन दिले. त्यावेळी ना. दानवे यांनी लवकरात लवकर कार्यवाही करून पार्सल बुकिंग सेंटर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा कमी होऊन प्रसंगी महागाईसुद्धा कमी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!