मालवण नगरपालिकेचा पराक्रम ; गणेश विसर्जनस्थळी टाकला खाडीतील गाळ

चिखलाच्या साम्राज्यामुळे नागरिक संतप्त ; नागरिकांच्या संतापानंतर गाळ हटवण्याची कार्यवाही

नगरपालिकेने कारभारात सुधारणा करावी, अन्यथा येत्या निवडणूकीत जनता जागा दाखवून देईल : मनसेचा इशारा

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण नगरपालिकेच्या “आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातय” कारभाराचा प्रत्यय गुरुवारी मालवणात दिसून आला. गुरुवारी सात दिवसाच्या गणपतींचे विसर्जन होण्यापूर्वी काही तास अगोदर पालिकेने येथील खाडीपात्रातील गाळ बाहेर काढून विसर्जन स्थळी टाकला. त्यामुळे पालिकेच्या या कारभाराबाबत नागरिकांनी संतप्त भूमिका घेतली. अखेर जनआक्रोशानंतर पालिकेने स्वच्छता कर्मचारी नेमून हा परिसर स्वच्छ करून दिला. मात्र या प्रकारामुळे मालवण नगरपालिका कारभाराचे वाभाडे निघाले.
दरम्यान, नगरपालिकेने आपल्या कारभारामध्ये सुधारणा करावी, अन्यथा येत्या निवडणूकीत नागरिक सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून देतील, असा इशारा मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिला आहे.

मालवण देऊळवाडा पुलाकडील गणेश विसर्जन स्थळी पात्रात साचलेला गाळ काढण्यासाठी मालवण पालिकेला सातव्या दिवसाचा मुहूर्त मिळाला. गुरुवारी या पात्रातील काढलेला गाळ काढून विसर्जन ठिकाणच्या चौथऱ्यावरच टाकण्यात आल्याने गणेश विसर्जनाच्या ठिकाणचा संपूर्ण परिसरच चिखलमय झाला. हा प्रकार पाहून नागरिक संतप्त बनले. त्यामुळे नागरिकांचा संतापाचा वाढलेला पारा बघून पालिका कर्मचाऱ्यांनी चिखलमय जागा साफ करून दिली. मात्र पालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गणेश उत्सवा आधीपासून नागरिक येथील गाळ काढण्याबाबत वारंवार मागणी करत होते. त्याची वेळेत दखल घेऊन योग्य पद्धतीने गाळ उपसा झाला असता तर पुन्हा गाळ काढण्यास विसर्जनावेळी येण्याची गरज पालिकेवर आली नसती. जनतेला विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे असताना सुरू असलेला पालिकेचा हा मनमानी कारभार ‘आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातय’ या प्रकाराप्रमाणे असल्याची टीका मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.

प्रभागातील नगरसेवक अकार्यक्षम असल्यानेच गणपती पाण्यात बुडत नाही

देऊळवाडा, आडवण, एसटी स्टँड कडील नागरिक दरवर्षी देऊळवाडा नदी येथे गणेश विसर्जन करतात. गेली अनेक वर्ष देऊळवाडा येथील नागरिक नगरपालिकेकडे गणेश विसर्जनासाठी गाळ उपसा करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी करत आहेत. आज नदीपात्रात पुलाच्या दोन्ही बाजुला गाळ साचलेला आहे. साचलेला गाळ कायमस्वरुपी काढणे गरजेचे आहे.मर्जीतील ठेकेदारासाठी दरवर्षी ४०-५० हजाराचे गाळ उपसा काढण्यासाठी कामे देण्याऐवजी नदीपात्रातील सर्व गाळ काढणे आवश्यक आहे.प्रभागातील नगरसेवक अकार्यक्षम असल्याने वर्षानुवर्षे येथील नागरिकांचा गणपती पाण्यात बुडत नाही.नगरपालिका प्रशासन ठोस उपासयोजना करताना दिसत नाही.आमदार वैभव नाईक यांनी देऊळवाडा नदीची पहाणी करुन गाळ काढण्याबाबत व पाणी अडवण्यासाठी नदीवर बंधारा बांधण्याचे नागरिकांना आश्वासन दिले होते.आमदार फक्त फसवी घोषणा आणि फसवी आश्वासने देतात.बंधारा सोडा गाळसुद्धा त्यांची सत्ता असलेली मालवण नगरपालिका काढू शकत नाही हे शहरवासियांचे दुर्दैव आहे. म्हणुन जनतेनेच येणाऱ्या नगरपालिका निवडूकीत मतांसाठी दारावर येणाऱ्या नगरसेवकांना गाळ पुर्ण उपसा का करत नाही याचा जाब विचारावा असे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी यावेळी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!