निसर्ग, तौक्ते वादळात केंद्र सरकारकडून राज्याला तुटपुंजी मदत !

खासदार विनायक राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल !

कुणाल मांजरेकर

मालवण : केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. नैसर्गिक आपत्ती निसर्ग, तोक्ते चक्रीवादळात अगदी तुटपुंजी मदत केंद्र सरकारने राज्य शासनाला केली. अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

मालवण तळगाव येथील निवासस्थानी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या खासदार राऊत यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर उपस्थित होते. नैसर्गिक आपत्ती काळात राज्यांच्या पाठीशी राहून भरघोस मदत करणे गरजेचे असताना कुत्सित भावनेतून केंद्र सरकार राज्य सरकारकडे पाहते. सावत्रपणाची वागणूक दिली जाते. याबाबतही खासदार राऊत यांनी केंद्र सरकार विरोधात स्पष्ट स्वरूपात नाराजी व्यक्त केली.

केंद्र सरकारने तुटपुंजी मदत राज्याला दिली असली तरी वादळ, पूर आदी आपत्ती काळात राज्य सरकारने मोठे मदतकार्य करून नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा दिला. मच्छिमार बंधावनाही मदत देण्यात आली. असे सांगून खासदार राऊत पुढे म्हणाले, राज्य शासनाच्या नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्यासाठी आपत्कालीन व्यवस्था निर्माण करण्यासाठी २२०० कोटी मंजूर करण्यात आले आहे. यातील जास्तीत जास्त निधी धुपप्रतिबंधक बंधारे, डोंगर उतारावर असलेल्या घरांना संरक्षक भिंती उभारणी, नद्या, खाडीतील गाळ उपसा आदींसह गावे वाचवण्यासाठी जास्तीत जास्त निधी वापरला जाणार आहे. राज्य शासनामार्फत जनतेला सेवा सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचेच नाव

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळ असे नाव द्यावे, ही मागणी आपण यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. विमानतळ ज्या ठिकाणी आहे तेथील ग्रामपंचायत व पालकमंत्री उदय सामंत यांनीही ‘बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळ’ नावाला सहमती दिली आहे. मात्र काहीजण विमानतळ नामांतर वरून राजकारण करत आहेत. बॅ. नाथ पै यांच्या नावावरून जर कोणी वाद घालत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव केलेली बरी. विरोध करणारी मंडळी हाताच्या बोटावर मोजण्या एवढीपण नाहीत. आणि अश्या लोकांच्या मताला आम्ही किंमतही देत नाही. विमानतळाला बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळ हेच नाव देण्याबाबत ठराव महाराष्ट्र विधानसभेत घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!