…. अशा आरोपांनी वैभव नाईक यांची प्रतिमा मलिन होणार नाही !

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून आ. नाईकांची पाठराखण

कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग : मुंबईतील मिठी नदी बाधितांच्या सदनिका वाटपात आमदार वैभव नाईक यांनी बोगस लाभार्थ्यांची नावे दिल्याचा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी करत राजकीय गोटात खळबळ उडवून दिली आहे. मात्र या प्रकरणात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वैभव नाईक यांची पाठराखण केली आहे. आमदार वैभव नाईक यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात काम सुरू आहे. एखाद्या विषयात पत्र देऊन त्यांनी मागणी केली असेल तर त्यात वावगं काय ? अशा आरोप-प्रत्यारोपांनी वैभव नाईक यांची प्रतिमा मलीन होणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी गुरुवारी आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मुंबईतील मिठी नदी बाधितांचे पुनर्वसन सुरू असून या क्षेत्रातील बाधितांना कांजूरमार्ग येथे सदनिका वितरण करण्यात येत आहे. मात्र या ठिकाणी बिल्डर लॉबीने शिरकाव केला असून बनावट बाधित तयार करून त्यांच्या नावे सदनिका लाटण्याचे उद्योग मुंबईत सुरू आहेत. या अनधिकृत धंद्यात शिवसेनेचे कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांचा समावेश असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी करून खळबळ उडवून दिली आहे. याबाबतचे ट्विट निलेश राणेंनी करून आमदार वैभव नाईक यांनी खोटे प्रकल्पग्रस्त तयार करून त्यांना घर मिळावे म्हणून शिफारस केल्याचा आरोप या ट्विट मध्ये केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी खोटं केल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणार असून याबाबत लोकायुक्त आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे देखील श्री. राणे यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांना विचारणा केली असता त्यानी आमदार वैभव नाईक यांची पाठराखण केली. आमदार म्हणून एखाद्या विषयात त्यांनी पत्र दिले असेल तर त्यामध्ये वावगं काय आहे ? सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार वैभव नाईक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी असे प्रकार सूरु असून अशा आरोपांनी त्यांची प्रतिमा मलिन होणार नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!