मुंबईत मिठी नदी बाधितांच्या सदनिका वाटपात घोटाळा ; आ. वैभव नाईक अडचणीत ?
भाजप नेते निलेश राणेंच्या ट्विटमुळे खळबळ ; अहवाल केला सादर
वैभव नाईकांची आमदारकी रद्द होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार
लोकायुक्तांसह न्यायालयाचेही दरवाजे ठोठावणार : निलेश राणेंचा इशारा
कुणाल मांजरेकर
मुंबईतील मिठी नदी बाधितांचे पुनर्वसन सुरू असून या क्षेत्रातील बाधितांना कांजूरमार्ग येथे सदनिका वितरण करण्यात येत आहे. मात्र या ठिकाणी बिल्डर लॉबीने शिरकाव केला असून बनावट बाधितांना तयार करून त्यांच्या नावे सदनिका लाटण्याचे उद्योग मुंबईत सुरू आहेत. या अनधिकृत धंद्यात शिवसेनेचे कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांचा समावेश असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. याबाबतचे ट्विट निलेश राणेंनी केले असून आमदार वैभव नाईक यांनी खोटे बाधित तयार करून त्यांना घर मिळावे म्हणून शिफारस केल्याचा आरोप त्यांनी या ट्विट मध्ये केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी खोटं केल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणार असून याबाबत लोकायुक्त आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे देखील श्री. राणे यांनी म्हटले आहे.
मुंबईतील मिठी नदी प्रकल्पाने बाधितांना कांजूरमार्ग येथे सदनिका वितरण करण्यात येत आहे. मात्र यामध्ये काही बिल्डरनी शिरकाव केला असून बनावट प्रकल्प ग्रस्तांची नावे यादीत टाकून सदनिका बळकावण्याचे प्रकार सुरू आहेत. या प्रकारात आमदार वैभव नाईक यांचाही सहभाग असल्याचा धक्कादायक आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबतचा अहवालच त्यांनी ट्विटरवर टाकला आहे. “शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी मुंबईतील मिठी नदी प्रकल्पात खोटे प्रकल्पग्रस्त तयार करून त्यांना घर मिळावे म्हणून शिफारस केली. आधार कार्ड वेगळे आणि माणसं वेगळी, आमदारकी वापरून एजंट कडून पैसे कमवायचा हा धंदा. या विषयाच्या खोलपर्यंत जाऊन संबंधितांना शिक्षा होणार याची मी खात्री देतो.” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे आमदार वैभव नाईक अडचणीत येण्याची शक्यता आहे. याबाबत आपण कायदेशीर बाबी तपासून न्यायालयात जाणार असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच वैभव नाईक यांनी खोटं करून आमदारकीचा गैरवापर केला असून त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणार असून लोकायुक्तांकडे देखील तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे श्री. राणेंनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हटलंय या कागदपत्रांत ?
१) मिठी नदी प्रकल्पाने बाधित एकूण १० प्रकल्पग्रस्तांची सुधारित शासन निर्णय दिनांक १६ मे, २०१५ नुसार निवासी वापरासाठी पात्रता निश्चित करून उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा सक्षम प्राधिकारी बांद्रा-१ यांनी परिशिष्ट-२ या कार्यालयास पाठविले.
२) श्री. वैभव नाईक मा. आमदार, कुडाळ-मालवण यांनी दि.०४/०७/२०१९ रोजीच्या मा. महानगर आयुक्त यांना सादर केलेल्या पत्राद्वारे मिठी नदी प्रकल्पाने बाधित एकूण १० प्रकल्पग्रस्तांचे कांजूरमार्ग येथे पुनर्वसन करावयास शिफारस केली.
३) मिठी नदी प्रकल्पाने बाधित एकूण १० प्रकल्पग्रस्तांचे विशिष्ट वसाहतीत पुनर्वसन करणेबाबत विनंती केलेल्या १० प्रकल्पग्रस्तांना कांजुरमार्ग येथील इमारत क्र. पी-२ मध्ये सदनिका वितरण करावयास मा. महानगर आयुक्त यांची दि. २८/०८/२०१९ रोजीची मान्यता
४) सदर १० प्रकल्पग्रस्ताच्या परिशिष्ट मधील नावाचे व्यक्ती व पुनर्वसनाचा लाभ घेणारे व्यक्ती ह्या वेगवेगळ्या असून खोट्या व्यक्ती पूनर्वसनाचा लाभ घेण्याचे प्रयत्न करीत असल्याबाबत या कार्यालयास तक्रार प्राप्त
५) तक्रारीच्या अनुषंगाने खोटया व्यक्ती पुनर्वसनाचा लाभ घेऊ नये म्हणून सखोल तपासणी करणे आवश्यक असल्याने सदर प्रकल्पग्रस्तांचे पात्रतेवेळी प्रकल्पग्रस्तांनी संबंधित उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा सक्षम प्राधिकारी यांचे कार्यालयास सादर केलेल्या व त्यांनी तपासलेल्या वास्तव्याच्या व ओळखीच्या पुराव्याच्या कागदपत्राच्या प्रती या कार्यालयास उपलब्ध करुन देण्याबाबत उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा सक्षम प्राधिकारी बांद्रा-२ यांना दि. १५/०१/२०२० रोजी पत्राने कळविण्यात आले.
६) त्या अनुषंगाने १) शकिल अहमद खान २) दिएक दिलीप सिंह चंदेलिया ३) मलिक जावेद काझी ४) संजू जयराम राठोड ५) इम्तियाज महेबूब शेख या ५ प्रकल्पग्रस्ताच्या वास्तव्याच्या व ओळखीच्या पुराव्याच्या कागदपत्राच्या प्रती उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा सक्षम प्राधिकारी बांद्रा-२ यांनी संदर्भाधीन दि. ०७/०२/२०२० प्राप्त दि. २४/०८/२०२० रोजीच्या पत्राव्दारे या कार्यालयास पाठविली आहेत. सदर ५ प्रकल्पग्रस्तापैकी श्री. शकिल अहमद खान यांचे संदर्भाधीन पत्रासोबत प्राप्त जोडपत्र ३/४ व आधारकार्ड वरील फोटोमधील व्यक्ती व पूर्वी परिशिष्ट-२ सोबत प्राप्त जोडपत्रावरील फोटोमधील व्यक्ती वेगवेगळी असल्याचे दिसूने येते.
७) इद्रिस अब्दुल वहाब चौधरी व अब्दुल कुगुर अब्दुल वहाब या दोन प्रकल्पग्रस्तांच्या वास्तव्याच्या व ओळखीच्या पुराव्यांच्या कागदपत्रांच्या प्रती उपजिल्हाधिकारी (अति/ निष्का) तथा सक्षम प्राधिकारी यांनी दि. १६/०३/२०२० रोजीच्या प्राप्त दि. २४/०८/२०२० रोजीच्या दोन स्वतंत्र पत्राव्दारे या कार्यालयास पाठविले आहे. सदर पत्रासोबत प्राप्त जोडपत्र ३/४ व इतर ओळखीच्या कागदपत्रावरील फोटोमधील व्यक्ती आणि यापूर्वी उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा प्राधिकारी बांद्रा-१ यांच्याकडील प्राप्त १) इद्रिस अब्दुल वहाब चौधरी २) अब्दुल कुद्रुस अब्दु वहाब यांच्या पात्रतेच्या परिशिष्ट २ सोबतच्या जोडपत्र ३/४ वरील फोटोमधील व्यक्ती वेगवेगळे असल्याचे दिसून येते.
८) तद्नंतर १) मुन्नी रामकिसन चौहान २) प्रविण रावजी मारु या दोन प्रकल्पग्रस्तांच्या वास्तव्याच्या व ओळखीच्या पुराव्याच्या कागदपत्राच्या प्रती उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा सक्षम प्राधिकारी बांद्रा-१ यांनी दि. ०७/०२/२०२० प्राप्त दि. २९/०९/२०२० रोजीच्या पत्रांव्दारे या कार्यालयास पाठविली आहेत.
९) उपरोक्त प्रमाणे एकूण १० प्रकल्पग्रस्तापैकी ९ प्रकल्पग्रस्तांचे वास्तव्याच्या व ओळखीच्या कागदपत्रांच्या प्रती उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा सक्षम प्राधिकारी बांद्रा-१ यांनी पाठविले असून एका प्रकल्पग्रस्ताचे वास्तव्याच्या व ओळखीच्या कागदपत्राच्या प्रती अद्याप अप्राप्त आहेत.
१०) उपरोक्त १० पैकी ९ प्रकल्पग्रस्तांच्या वास्तव्याच्या व ओळखीच्या कागदपत्राच्या प्रती या कार्यालयास पाठविल्या आहेत. परंतु उपरोक्त प्रकल्पग्रस्तांचे बाबतीत आपण परिशिष्ट-२ तयार करणेपूर्वी प्रकल्पग्रस्तांकडील प्राप्त कागदपत्रांची संबंधीत विभागाकडून पडताळणी केली आहे. किंवा कसे? याबाबत उल्लेख केलेला दिसुन येत नाही. पडताळणी केली नसल्यास तसा अहवाल संबंधीत विभागाकडून प्राप्त करून घेऊन आपला सुस्पष्ट खुलासा / अभिप्राय देण्यात यावा जेणेकरुन प्रकरणों पुढील कार्यवाही करणे शक्य होईल. तसेच आपले कार्यालयीन पत्र दि.०७/०२/२०२० व १६/०३/२०२० सोबतचे जोडपत्रावरील ३ व्यक्तींचे फोटोमध्ये सुध्दा तफावत दिसून येते. याबाबतही आपला स्वयंस्पष्ट अभिप्राय द्यावा असे दि. २०/१०/२०२० रोजीच्या पत्राने कळविण्यात आले.
११) या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा सक्षम प्राधिकारी बांद्रा-१ यांनी दि.२३/११/२०२० रोजीच्या पत्राने असे कळविले आहे की, सदर प्रकल्पग्रस्तांचे पात्रतेवेळी वास्तव्य व ओळखीवाबत पुराव्यांच्या झोपडीधारकांनी त्यांचे जोडपत्र ३ / ४ सोबत सादर केलेल्या कागदपत्राच्या प्रती आपले कार्यालयास यापूर्वीच पाठविण्यात आलेल्या आहेत. तरी सदर प्रकरणी आपले कार्यालयामार्फत जरुर ती चौकशी करुन पुढील कार्यवाही होणेस विनंती आहे कळविले आहे. परंतु त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांचे परिशिष्ट-२ तयार करणेपूर्वी प्रकल्पग्रस्तांकडील प्राप्त कागदपत्रांची संबंधीत विभागाकडुन पडताळणी केली आहे किंवा कसे? याबाबतचा सुस्पष्ट खुलासा / अभिप्राय तसेच त्यांचेकडील कार्यालयीन पत्र दि. ७/०२/२०२० व १६/०३/२०२० रोजीच्या पत्रासोबत प्राप्त जोडपत्रावरील ३ व्यक्तींच्या फोटोमधील तफावतीबाबत सुध्दा स्वयंस्पष्ट अभिप्राय दिलेला नाही.
१२) उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा सक्षम प्राधिकारी बांद्रा-१ यांचे कार्यालयाकडे तपासणी व अभिप्राया करिता पाठविलेल्या मिठी नदी प्रकल्पातील एकुण १० प्रकल्पग्रस्तांपैकी संदर्भाधीन पत्रान्वये प्राप्त एकुण ९ प्रकल्पग्रस्तांपैकी शकिल अहमद खान, इद्रिस अब्दुल वहाब चौधरी व अब्दुल कुद्रुस अब्दुल वहाब या ३ व्यक्तींच्या जोडपत्रावरील फोटोमध्ये सकृतदर्शनी तफावत आढळून येत असल्याने त्यांची पात्रता रद्द करण्याची शिफारस व प्रकल्पग्रस्ताकडील कागदपत्रांची व सदर प्रकल्पग्रस्ताचे परिशिष्ट-२ तयार करण्यापूर्वी संबंधित विभागाकडून पडताळणी केली आहे किंवा कसे? पडताळणी केली असल्यास तसे या कार्यालयास कळविण्यात यावे असे उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा सक्षम प्राधिकारी, बांद्रा-१ यांना दि. १६/१२/२०२० रोजीच्या पत्राने कळविण्यात आले आहे परंतु अद्याप अहवाल अप्राप्त आहे.
१३) सदर ९ प्रकल्पग्रस्ताचे वास्तव्याच्या व ओळखीच्या पुराव्याच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या कागदपत्राची / पुराव्याची पडताळणी प्राधिकरणाव्दारे करण्याकरिता सामाजिक विकास कक्षामधील तहसिलदार श्रीमती अर्चना प्रधान यांची नेमणूक करण्यात आली. श्रीमती अर्चना प्रधान, तहसिलदार (सा.वि.क.) यांच्यामार्फत संबंधित विभागाकडील पडताळणी अहवाल प्राप्त झाला असून सदर अहवालाचे व निष्कर्षाचे अवलोकन केले असता संबंधित विभागाकडून पडताळणी केलेल्या एकूण ९ प्रकल्प ग्रस्तांपैकी श्री. प्रविण रावजी मारू या प्रकल्पग्रस्ताचे निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड इ. बाबी व त्यावरील छायाचित्र व जोडपत्रावरील छायाचित्र जुळत असल्याचे दिसून येते असल्याने त्यांनी कांजूरमार्ग येथील इमारत क्र. पी २ मधील सदनिका क्र. १३१६ दि.१३/०२/२०२१ रोजी वितरीत करण्यात आली. परंतु उर्वरीत ८ प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत मतदार यादीनुसार नावे जुळत असल्याचे दिसुन येते परंतु मतदार यादी पॅनकार्ड, आधारकार्ड व जोडपत्रावरील छायाचित्रामध्ये तफावत असल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर ८ प्रकल्पग्रस्तांचे पात्रता रद्द करणेबाबत अपिलीय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मुं.म.प्र.वि.प्रा. यांचेकडे दि. १४/०१/२०२१ रोजी अपिल दाखल करण्यात आले. तसेच अपिलीय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी, मुं.म.प्र.वि.प्रा. यांनी प्रकरणी दि.०८/०२/२०२१ रोजी सुनावणी घेतल्याचे दिसून येते
१४) अपिलीय अधिकारी, यांनी प्रकरणी तपासणीअंती निर्णय घेऊन या विभागास आदेश प्राप्त झाल्यानंतर ८ प्रकल्पग्रस्तांना सदनिका वितरीत करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल असं मा. श्री. एकनाथ शिंदे, मा. मंत्री, नगरविकास महाराष्ट्र राज्य व अवर सचिव, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांना २९/०४/२०२१ रोजी कळविण्यात आले आहे.