सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर : मालवणच्या राजकीय पटलावरील उगवता तारा…

कुणाल मांजरेकर (मालवण)

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आजचा तरुण हाच उद्याचा समर्थ भारत घडवणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी राजकारण आणि समाजकारणात सक्रिय व्हायला हवं, असा संदेश दरवेळी आपल्याला ऐकायला मिळतो. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आपल्या शहराचा, आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी धडपडणारं मालवण मधलं युवा नेतृत्व म्हणजे सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर…. मालवण शहराच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर “उगवता तारा” अशी सौरभची ओळख बनली आहे. आज १५ एप्रिल २०२३ रोजी त्याचा २९ वा वाढदिवस… यानिमित्ताने सौरभच्या वाटचालीचा थोडक्यात घेतलेला आढावा….

सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर… सौरभच्या नावामध्ये असलेलं “श्रीकृष्ण” हे नाव खरं तर मालवणात राहणाऱ्या, मालवणात वावरणाऱ्या प्रत्येकासाठी खूप मोठं आहे. श्रीकृष्ण ताम्हणकर यांना न ओळखणारा माणूस इकडे सापडणे म्हणजे कठीणच. व्यावसायिक क्षेत्राचं फार मोठं वलंय असलेल्या कुटुंबातील सौरभला खरं तर राजकारण आणि समाजकारणाची फारशी गरजच नव्हती. सात पिढ्या ऐशोआरामात वाढतील एवढं ऐश्वर्य या कुटुंबाकडे आहे. मात्र सौरभने लहान पणापासूनच आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्यांच्या व्यथा, वेदना जवळून पाहिल्या. इकडचे प्रश्न समजून घेतले. त्यामुळे ज्या समाजात आपण वाढलो, ज्या समाजाने आपल्या कुटुंबाला प्रेम दिलं, मानसन्मान दिला, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या जाणीवेतून सौरभ याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभाग घेतला. आज राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र अशा सर्वच आघाड्यावर सौरभ याने स्वतःचं वलंय निर्माण केलं आहे.

मालवण मधील प्रतिथयश मत्स्य उद्योजक श्रीकृष्ण ताम्हणकर यांचा सुपुत्र असलेल्या सौरभ याचा जन्म १५ एप्रिल १९९४ रोजी झाला. दहावी पर्यंतच शिक्षण मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कुल मधून घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पुणे आणि गोवा येथून त्याने पूर्ण केलं. बाहेर गावी शिक्षण घेतलं तरी आपल्या गावची ओढ त्याला कायम होती. त्यामुळे वयाच्या साधारण २० व्या वर्षांपासूनच त्याने वडिलांच्या व्यवसायाच्या निमित्ताने मालवणात लक्ष देण्यास सुरुवात केलं. यावेळी छोटे मच्छिमार आणि त्यांच्या समस्या त्याने जवळून अनुभवल्या. या घटकासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, या जाणीवेतून त्याने सर्वसामान्यांचे प्रश्न अधिक जवळून अनुभवले. येथील समुद्र किनारे हे इथल्या पर्यटनाचे वैभव आहे. मात्र येथील संपूर्ण किनारपट्टी कचऱ्याने भरली असून किनारपट्टी स्वच्छता या मोहिमेकडे त्याने जाणीवपूर्वक लक्ष दिला. युथ बिट्स फॉर क्लायमेंट या संस्थेच्या नेतृत्वाखाली किनारपट्टी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. अलीकडे सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने मालवणच्या किनारपट्टीवर सातत्याने किनारपट्टी स्वच्छता अभियान घेऊन शहर स्वच्छतेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले जात आहे. यासाठी मालवण नगरपालिकेची मदत देखील घेतली जात आहे.

सौरभ याला स्वतःला क्रिकेटची फार आवड आहे. इथल्या मुलांमध्ये देखील क्रिकेटचे कौशल्य मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यांना योग्य ती संधी आणि दर्जेदार सराव मिळत नाही. यामुळे इथला तरुण क्रिकेट मध्ये मागे पडतो. हे जाणून लहान मुलांना लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षण मिळण्यासाठी सौरभ याने आपल्या सहकारी मित्रांसह पाच वर्षांपूर्वी मालवण क्रिकेट क्लबची स्थापना केली. या क्लबचे अध्यक्ष पद सौरभ सांभाळत आहे. या क्लब मार्फत मागील पाच वर्षे सातत्याने “मालवण प्रीमिअर लीग” ही लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा मालवण मध्ये भरवण्यात येत आहे. आपल्या कडील मुले देखील लेदरबॉल चा सराव करून एक दिवस राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळावीत यासाठी सौरभ ताम्हणकर आणि त्याच्या मित्र परिवाराकडून प्रयत्न सुरु आहेत. येत्या २४ एप्रिल पासून १७ वर्षांखालील मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सौरभ आज भारतीय जनता पार्टीत कार्यरत आहे. त्याच्या भाजपा प्रवेशाची कथा देखील इंटरेस्टींग आहे. सौरभ याला भाजपची लहान पणापासूनच आवड होती. आणि मालवणशी निगडित असल्याने त्याला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाची भुरळ पडली होती. मात्र नारायण राणे हे काँग्रेस आणि त्यानंतर स्वतःच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात कार्यरत होते. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना देखील राजकीय एंट्रीची योग्य वेळ त्याला मिळाली नव्हती. एकीकडे भाजपची आवड आणि नारायण राणेंच्या नेतृत्वाची भुरळ त्यामुळे नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करायचा, या विवंचनेत असताना २०१९ मध्ये नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, या प्रवेशामुळे खरा फायदा सौरभ याचा झाला. भारतीय जनता पार्टी आणि नारायण राणेंचे नेतृत्व मान्य करीत त्याने आपली वाटचाल सुरु केली. सहा महिन्यांपूर्वी भाजपचे युवा नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली त्याने आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात अधिकृत प्रवेश केला. मागील सहा महिने भाजपच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने राबवण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी नरकासुर स्पर्धा, तुळशी सजावट स्पर्धा, ख्रिसमस सणानिमित्त स्टार मेकिंग स्पर्धा असे विविधांगी उपक्रम घेण्यात आले आहेत. आपल्याला आपल्या समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यासाठीच भाजपच्या माध्यमातून आपले प्रयत्न सुरु असल्याची प्रतिक्रिया सौरभ याने व्यक्त केलीय. आज त्याचा २९ वा वाढदिवस साजरा होतोय. एवढ्या कमी वयात सौरभ याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात घेतेलेली गरुड झेप निश्चितच उल्लेखनीय म्हणावी लागेल. त्याच्या पुढील वाटचालीसाठी कोकण मिरर परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा !!!!!

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!