ना. राणेंच्या संकल्पनेतून कुडाळमध्ये आयोजित उद्योग संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्ह्यातील उद्योजकांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ना. राणे, पालकमंत्री चव्हाण यांच्या सोबत संयुक्त बैठक
मालवण | कुणाल मांजरेकर
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांचा संवाद मेळावा कुडाळ एमआयडीसी येथे संपन्न झाला. या मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक कोटीच्या वरील व्यावसायिक उलाढालीतील ७६ उद्योजक सहभागी झाले होते.
या उद्योग मेळाव्यास MSMEचे सहाय्यक प्रबंधक अनुपम श्रीवास्तव, लघुउद्योग क्रेडिट फंडचे (CGTMSE) उप महाप्रबंधक धीरज कुमार, व्यवस्थापक शहाजी के, व्यवस्थापक संगीता पुजारी तसेच भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक प्रसाद प्रभू, बॅक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक कुमार सिंग, एचडीएफसी बँकेचे मुख्य प्रबंधक राजका कोर व गणेश सरडा, अमित जाधव, आदिनाथ कोरडे तसेच सिंधुदुर्ग लीड बँकेचे मॅनेजर मुकेश मेश्राम उपस्थित होते.
अनुपम वास्तव यांनी सूक्ष्म लघु मध्यम मंत्रालयाच्या योजनांची माहिती दिली. उद्योजकांना मंत्रालयामार्फत कसे सहकार्य केले जाते, योजनेचा फायदा घेताना उद्योजकाला येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी मंत्रालयामार्फत पोर्टलवर कशी तक्रार करावी व मार्गदर्शन घ्यावे याचे मार्गदर्शन केले. धीरज कुमार यांनी दोन करोड ते पाच करोड पर्यंत उद्योजकांना लघुउद्योग क्रेडिट फंडातून ( CGTMSE) कशी मदत केली जाते, या योजनेचा कसा उद्योग वाढीसाठी प्रयत्न केला जातो. बँकेकडे कसे प्रकरण करावे. याची संक्षिप्त माहिती दिली. तसेच या योजनेमध्ये सहभाग घेतलेल्या उद्योजकांना शंभर टक्के मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही योजना महाराष्ट्रामध्ये १०० % कार्यान्वित असल्याचे सांगितले.
प्रसाद प्रभू यांनी बँकेत कसे प्रकरण करावे याची माहिती देऊन या योजनेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बँकेने कुडाळ येते स्वतंत्र कक्ष उभारला असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले व या कर्ज योजनेचे फॉर्म उपलब्ध करून दिले. मुकेश मेश्राम यांनी लीड बँक कसे सहकार्य करते व कसा फायदा करून देता येतो, उद्योजकाचा सिविल घसरला असला तरी या योजनेचा कसा फायदा घेता येतो. याचे मार्गदर्शन केले. उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ धुर्ये व नितीन तायशेट्ये यांनी सर्व अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
केंद्रीय कॅबिनेटमंत्री नारायण राणे जिल्ह्यात नवीन उद्योजक व्हावेत, असलेल्या उद्योजकांना आर्थिक बळकटी मिळावी, रोजगार देणारा जिल्हा अशी सिंधुदुर्गाची ओळख देशाला व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठीच उदयोजकता संवादचे आयोजन करण्यात आले आहे. जो उद्योजक सिंधुदुर्गात उद्योग उभारेल, त्या उद्योजकाला उद्योग उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेड कार्पेट घालण्यात येईल असेही सिंधुदुर्ग जिलह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केल्याचे विजय केनवडेकर यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले.
एक करोड वरील उद्योग गुंतवणूक असणाऱ्या उद्योग संवाद मेळाव्यात नकुल पार्सेकर, संजय भोगटे, विजय राणे, श्रीराम शिरसाट, पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर, निलेश धडाम, डॉ. व्यंकटेश भंडारी, नंदन वेंगुर्लेकर नारायण जाधव, डॉ. पावसकर यांसह इतर उद्योजकांनी चर्चेत सहभाग घेतला. काजु उद्योग, काथ्या उद्योग, या उद्योगावर यावेळी चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्योजकांना येत असणाऱ्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर संयुक्त सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. मोहन होडावडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.