मालवणात वन विभागाचा नाकर्तेपणा ; जखमी माकड तीन तास उपचाराविना विव्हळत…

प्राणीमित्र सौ. शिल्पा खोत यांच्या मध्यस्थीमुळे माकडाला जीवदान ; वनविभागाने मालवणसाठी रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करून देण्याची सौ. खोत यांची मागणी

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण कसाल महामार्गावर आनंदव्हाळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या माकडाला वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे तीन तासाहून अधिक काळ उपचाराविना विव्हळत राहावे लागल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. या अपघाताची माहिती मिळताच मालवणच्या प्राणीमित्र सौ. शिल्पा खोत यांनी घटनास्थळी धाव घेऊन या माकडाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र मालवणात वन विभागाकडे रेस्क्यू वाहन उपलब्ध नसल्याने उपचारात कमालीचा हरगर्जीपणा झाला. अखेर सौ. खोत यांच्या पुढाकाराने खासगी वाहनातून वनविभागाने या जखमी माकडाला उपचारासाठी कुडाळ येथे नेले. या प्रकाराबद्दल सौ. खोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मालवणात मोठ्या प्रमाणात जैवविविधता असून याठिकाणी स्वतंत्र रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करून देण्या साठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आनंदव्हाळ येथे अज्ञात वाहनाने माकडाला धडक दिल्याची दुर्घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. सदरील प्रकार सायली कांबळी यांनी शिल्पा खोत यांना कळवल्यानंतर त्या तातडीने दर्शन वेंगुर्लेकर यांच्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. आणी त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. काही वेळाने वन विभागाचे अधिकारी मोटरसायकल घेऊन येथे दाखल झाले. मात्र त्यांच्याकडे माकडाला उपचारासाठी नेण्याकरिता वाहन नव्हते. या माकडाची प्रकृती गंभीर असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दळवी यांना येथे पाचारण करण्यात आले. त्यांनी माकडाला भुलीचे इंजेक्शन दिले. मात्र या माकडाला उपचारासाठी न्यायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला. अखेर सौ. शिल्पा खोत यांनी खासगी टेम्पो मागवल्यानंतर या गाडीने माकडाला उपचारासाठी कुडाळला पाठवण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी तीन तासाहून अधिक कालावधी लोटला. मात्र शिल्पा खोत यांनी घेतलेल्या पुढाकाराने या माकडाचे प्राण वाचले आहेत. यासाठी प्राणीमित्र आनंद बांबर्डेकर यांची मोठी मदत मिळाली. त्यांच्यासह प्राणीमित्र डिसोजा ( कुडाळ), स्वाती पारकर, गौरी कुमामेकर यांचेही सहकार्य मिळाल्याचे सौ. खोत यांनी सांगितले.

मालवणमध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता असून पशु, पक्षी आहेत. त्यामुळे मालवणसाठी वनविभागाने रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करून द्यावी तसेच कांदळगाव येथील वनविभागाचे रिक्त पद भरावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!