चौके- आंबेरी बसफेरीचा प्रश्न निकाली ; अशोक सावंत आक्रमक
कोविड मुळे बंद असलेली बसफेरी सुरू होईपर्यंत आगार प्रमुखांचे कार्यालय न सोडण्याचा दिला होता इशारा
मालवण (प्रतिनिधी)
कोविड काळात बंद असलेली चौके- आंबेरी बसफेरी सुरू करण्यात न आल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी मागणी करूनही ही बसफेरी सुरू न केल्याने भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी सोमवारी आगारप्रमुखांची भेट घेत आक्रमक पवित्रा घेतला. जोपर्यंत बसफेरी सुरू करण्याचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही, असे सांगून एसटीच्या विभाग नियंत्रकांशी त्यांनी संपर्क साधला. यानंतर तात्काळ चौके आंबेरी मार्गावर एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आंबेरी मध्ये मालवण, चौके ते आंबेरी गणेशकोंड पर्यंत सकाळी ८ वाजता, १० वाजता व दुपारी २ वाजता सुरु असणारी एस.टी. फेरी कोविड कालावधी मध्ये बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अत्यावश्यक कारणांसाठी ये जा करण्याकरिता चालत, खाजगी वाहनाने किवा रिक्षा या प्रकारे प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने मालवण, चौके ते आंबेरी गणेशकोंड एस.टी. फेरी नियमित वेळेवर सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. गणेश चतुर्थी कालावधी जवळ आल्याने भाविकांचा ओघ गावाकडे असणार आहे. त्यानिमित्ताने एस.टी.ची आवश्यकता असणार भासणार आहे. आंबेरी हा गाव दुर्गम भागात असल्यामुळे नियमित खाजगी वाहने वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे याबाबत गांभीर्यपूर्वक विचार करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी आगारप्रमुख नरेंद्र बोधे यांची भेट घेतली. यावेळी चौके-आंबेरी मार्गावर तात्काळ एसटी सेवा सुरू करा, अन्यथा कार्यालय सोडणार नाही, असा इशारा श्री. सावंत यांनी दिला. यावेळी एसटीच्या विभाग नियंत्रकांशी देखील फोन वरून चर्चा करण्यात आली. यानंतर या मार्गावर दोन फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत श्री. सावंत यांनी एसटी प्रशासनाचे आभार मानले आहेत. यावेळी किशोर वाक्कर, पोलीस पाटील दिलीप राऊत उपस्थित होते.