“शिवगर्जना” महानाट्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात ; विशाल परब आणि सहकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी
महानाट्यात हत्ती, उंट, घोड्यांचा सहभाग ; मोफत पासेसच्या माध्यमातून जिल्हावासियांना अनुभवता येणार शिवकालीन इतिहास
कुडाळ | कुणाल मांजरेकर
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाउंडेशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने कुडाळ मधील नवीन बेस्ट स्टॅन्डच्या मैदानावर आशिया खंडातील सर्वात मोठे “शिवगर्जना” हे महानाट्य होणार आहे. या महानाट्याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्यासह दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हे महानाट्य जिल्हावासीयांना अनुभवता यावे यासाठी जिल्ह्याभरात मोफत पासेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच ज्या व्यक्तींना पासेस मिळाले नाहीत, अशांसाठी कुडाळ एसटी डेपोच्या मैदानावर काउंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर युवा नेते विशाल परब आणि सहकाऱ्यांनी कुडाळ एसटी डेपो येथे भेट देऊन या महानाट्यासाठी उभारण्यात येत असलेल्या मंडपाची पाहणी केली.
कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष, युवा नेते विशाल परब, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, विनायक राणे, दीपक नारकर, राजवीर यांची आदी उपस्थित होते. यावेळी दादा साईल म्हणाले, भाजप नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाउंडेशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने शिवगर्जना हे महानाट्य १७ मार्च रोजी होणार आहे. या महानाट्यात १००० ते १२०० कलाकारांचा सहभाग असून हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा सहभाग आहे. या महानाट्या दरम्यान भाजपा नेते निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या महानाट्यासाठी दोनशे फूट लांबीचा रंगमंच उभारण्यात येत असून व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी विशेष बैठक व्यवस्था असणार आहे. या ठिकाणी २५ ते ३० हजार खुर्च्या तसेच गॅलरीची सोय करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त सहा ठिकाणी भव्य स्क्रीन उभारण्यात येणार आहे. या सोहळ्याला शिवप्रेमी नागरिक तसेच निलेश राणेे यांचे चाहते मोठ्या संख्येने दाखल होणार असून महामार्गाच्या पलीकडील जागेवर पाच ते दहा हजार जागांची वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात येणार असल्याचे दादा साईल म्हणाले.