विकास निधीचे श्रेय आ. वैभव नाईक यांचेच ; बॅनर, फोटो छापून विकास निधी खेचता येत नाही…
हरी खोबरेकर यांचा भाजपा पदाधिकाऱ्यांना टोला ; आ. नाईकांचा बंधाऱ्यांच्या कामांसाठी वर्षभर पाठपुरावा
मालवण | कुणाल मांजरेकर
आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात मालवण तालुक्यातील किनारपट्टीवरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी ४२ कोटींची तरतूद झालेली आहे. यामध्ये देवबाग, वायरी, दांडी, तोंडवळी – तळाशील, सर्जेकोट येथे हे बंधारे होणार आहेत. या बंधार्यांसाठी मागील वर्षभर आमदार वैभव नाईक मंत्रालय आणि सचिव स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत होते. कोणत्याही बंधाऱ्यांच्या कामाला पाच ते सहा महिन्यात मंजुरी मिळत नाही. बॅनर आणि फोटो लावले म्हणून विकास निधी खेचता येत नाही. त्यामुळे भाजपच्या पदाधिका ऱ्यांनी फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी लगावला आहे.
येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. खोबरेकर हे बोलत होते. यावेळी युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, पूनम चव्हाण, उमेश मांजरेकर, निनाक्षी मेथर, किशोर गावकर, अक्षय रेवंडकर, अक्षय वालावलकर, उमेश चव्हाण, अंबाजी सावंत आदी उपस्थित होते.
किनारपट्टीवरील स्थानिक ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार या बंधाऱ्यांसाठी आ. नाईक यांचा पाठपुरावा सुरू होता. त्या उलट काही जणांनी किनारपट्टी गावांमध्ये स्वनिधीची पत्रे दाखवत थाटामाटा भूमिपूजने केली. दहा दिवसात दहा कोटी रूपये देण्याचा तोंडवळी तळाशील ग्रामस्थांना शब्दही दिला. मात्र एक रुपयाही ते देऊ शकले नाहीत, अगर एक दगड देखील बसवू शकले नाहीत. परंतु आमदार वैभव नाईक हे सातत्याने सचिवालय तसेच पतन विभागाकडे या बंधार्यांसाठी पाठपुरावा करत होते. त्यानुसार हा निधी मंजूर झाला आहे. मात्र मागील दोन दिवस भाजपा पदाधिकारी बॅनरबाजी आणि पत्रकबाजी करून ही बंधाऱ्यांची कामे आपल्याच माध्यमातून झाल्याच्या फुकाच्या वल्गना करीत आहेत. मालवण तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यासाठी देखील आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, असे हरी खोबरेकर म्हणाले.
नारायण राणे केंद्रीयमंत्री झाल्यावर मालवणसाठी त्यांनी किती निधी आणला ? स्वतःच्या खासदारकीचा किती निधी मालवणला दिला, असा प्रश्न करून आमदार वैभव नाईक यांनी स्वनिधीतून दिलेल्या रकमे एवढा निधी देखील नारायण राणेंना केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मालवणात आणला नाही. ही खंत राणे समर्थकांना आहे. त्यामुळे एखादा निधी मंजूर झाल्यानंतर बॅनरबाजी आणि पत्रकबाजी करून आमदार वैभवव नाईक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर टीका करण्याचे काम भाजपाचे पदाधिकारी करीत आहेत. मात्र दिल्लीपासून गल्ली पर्यंत आमच्या शिवसैनिकांकडून विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. जे आराखडे बनवले जातात, ते एक वर्षांपूर्वी बनतात. मात्र याची माहिती भाजपा पदाधिकाऱ्यांना नाही. यानंतरच्या काळातही मालवण तालुक्यात विकासकामे आणण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू राहणार असून ज्या ठिकाणी बंधाऱ्यांची कामे मंजूर झाली आहेत, त्या ठिकाणी पर्यावरण आणि अन्य परवानग्या मिळवून तातडीने ही कामे सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.