आजपर्यंत कागदावरचाच निधी आणणाऱ्या आ. वैभव नाईक आणि कंपूने युतीच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नये !

भाजपा पदाधिकाऱ्यांचा सल्ला ; आमदार – खासदार फंडा व्यतिरिक्त अन्य विकास कामांवरील ठाकरे गटाचा दावा चुकीचा

मालवण | कुणाल मांजरेकर

राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष पाठपुरावा करून तसेच माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवणात अलीकडे कोट्यावधींचा विकास निधी आला आहे. भाजपा सरकारने केवळ निधीची घोषणा केली नाही तर त्याबाबत जीआर काढून हा निधी प्रत्यक्षात उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी ठाकरे सरकारच्या काळात मालवण तालुक्याने आमदार वैभव नाईक यांचा कागदावरचा विकास अनेकदा पाहिला आहे. खोटी पत्रे देऊन लोकांची दिशाभूल करण्याचे एकमेव काम वैभव नाईक यांनी केले. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर झालेली विकास कामे माझ्याच माध्यमातून झाल्याचे धादांत खोटी वक्तव्य आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या कंपू कडून होत आहेत. आयुक्त अथवा मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रांचा आधार घेऊन या वल्गना केल्या जात असल्याची टीका भाजपा पदाधिकाऱ्यांनी मालवणात पत्रकारांशी बोलताना केली. आमदार, खासदार फंडातून होणाऱ्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा अधिकार वैभव नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आहे. पण केंद्र अथवा राज्य शासनाच्या माध्यमातून आणि भाजपा, शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रयत्नातून होणाऱ्या विकासकामांचे श्रेय त्यांनी घेऊ नये, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी मालवण भाजप कार्यालय येथे आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक आणि सहकार्यांवर टिका केली. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी जिप सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, मोहन वराडकर, महेश सारंग, युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगांवकर, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, बबन परब, सुशील शेडगे, निकम यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक गेल्या दहा वर्षात मालवण मध्ये एक इंचही सागरी धूपप्रतिबंधक बंधारा बंधू शकले नाही. यापूर्वी नारायण राणे यांच्या माध्यमातून चिवला बीच, दांडी व राजकोट येथे बंधारा कम रस्ता झाल्याने तेथील किनारपट्टी सागरी अतिक्रमणापासून सुरक्षित होऊन आज त्याठिकाणी पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. हे बंधारे त्यावेळी मी आणि दीपक पाटकर यांनी मागणी केल्यामुळे ना. राणे यांच्या प्रयत्नाने झाले होते. दांडी येथे उर्वरित किनारपट्टीवर देखील बंधारा कम रस्ता होणे आवश्यक असताना आम. नाईक यांनी त्याठिकाणी केवळ दगडी बंधारा बांधण्याचा घाट घातला आहे. त्यास दांडी वासियांचा विरोध आहे. ही बाब आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणली असून त्यांनी या बंधाऱ्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्याकडून या बंधाऱ्याबाबत निश्चित योग्य ती कार्यवाही होईल. आम. नाईक व त्यांच्या चमूने जनतेची दिशाभूल करण्याचे काम बंद करावे, असे सुदेश आचरेकर म्हणाले.

धोंडी चिंदरकर म्हणाले, ज्यावेळी सत्तेत होता, तुमचे मुख्यमंत्री होते. तेव्हा विकासकामे करणे शक्य झाले नाही. मात्र आज सत्ता नाही. विरोधी बाकावर असताना भाजप युती सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे आपली सांगण्याचे काम आमदार वैभव नाईक व त्यांचा कंपू करत आहेत. जनतेची दिशाभूल करणे हेच आमदार वैभव नाईक यांचे काम आहे. अशी टीका भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केली आहे.

ठाकरे सरकार असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा कोणताही मंजूर झाला नाही अथवा काम पूर्ण झाले नाही. त्याउलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुमारे ४२ कोटी निधीतून मुख्यमंत्री सडक योजनेची कामे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली. आताही भाजप युती सरकार माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे होत आहेत. मोठ्या प्रमाणात विकासनिधी बंधारे यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न आहेत. असे विजय केनवडेकर यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!