अर्थसंकल्प २०२२-२३ | हिवाळे धुरीवाडी येथील पुलासाठी ५.५९ कोटी मंजूर…

केंद्रीयमंत्री नारायण राणेंसह माजी खा. निलेश राणे यांचा पाठपुरावा : माजी सभापती महेंद्र चव्हाण यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील हिवाळे धुरीवाडी येथील मोठ्या पुलासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून ५ कोटी ५९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे, भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी विशेष पाठपुरावा केल्याची माहिती माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

गेली कित्येक वर्षे हिवाळे धुरीवाडी पुल नसल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत होते. ही बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देताच त्वरीत बजेट मधून या पुलासाठी तरतुद करण्यात आली आहे. यामुळे हिवाळे मधील जनतेच्या दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. हे काम मंजूर झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचेही माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण आणि हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी यांनी विशेष आभार मानले आहेत. हे काम मार्गी लागल्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3595

Leave a Reply

error: Content is protected !!