दांडी किनारपट्टीवर २७ ते ३० एप्रिलला होणार “गाबीत महोत्सव”

सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विषयांवर परिसंवाद, गाबीत सुंदरी, नौकानयन स्पर्धेसह विविधांगी कार्यक्रम

मालवण | कुणाल मांजरेकर

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, गाबीत समाज महाराष्ट्र आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३० एप्रिल या कालावधीत मालवण दांडी किनारी “गाबीत महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विषयांवर परिसंवाद, नौकानयन स्पर्धा यांसह भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

या महोत्सवाच्या पूर्वनियोजनासाठी गाबीत समाजाची बैठक नुकतीच मालवण येथे पार पडली. यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, गाबीत समाज महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत, गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, ऍड. काशिनाथ तारी, नारायण आडकर, कार्याध्यक्ष बाबा मोंडकर, राजन गिरप, मेघनाद धुरी, दिपक तारी, सौ.स्नेहा केरकर, रविकिरण तोरसकर, महेंद्र पराडकर, संजय पराडकर, लक्ष्मण तारी, किरण कुबल यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आजपासून तालुका बैठका ; १५ रोजी जिल्हास्तरीय बैठक

या महोत्सवासाठी सर्वाँना सहभागी करून घेण्यासाठी ११ मार्च रोजी सकाळी ११ वा. वेंगुर्ला तालुका बैठक हुले यांचे होमस्टे मांडवी येथे आयोजित केली आहे. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता देवगड शिक्षक भवन येथे बैठक आयोजित केली आहे. तसेच १३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मालवण येथील दांडेश्वर मंदिर येथे मालवण तालुका गाबीत समाज बैठक आयोजित केली आहे. १५ मार्च 2023 रोजी सकाळी ११ वाजता मालवण येथील दांडेश्र्वर मंदिर दांडी येथे सर्व जिल्हा व तालुका गाबीत बांधवांची बैठक होणार आहे. या तालुका व जिल्हा बैठकांमध्ये जिल्ह्यातील गाबीत समाजातील सर्व गाव कमिटी प्रतिनिधी, आजी माजी पं.स. व जिल्हापरिषद सदस्य, आजी माजी नगराध्यक्ष व नगरसेवक, विविध मत्स्य सहकारी संस्था, सांस्कृतिक मंडळे, सामाजिक मंडळे यांचे प्रतिनिधी तसेच गाबीत समाजातील डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, पर्यटन व इतर व्यावसायिक, रापण संघाचे प्रतिनिधी, महिला बचतगटाच्या प्रतिनिधी, क्रीडा मंडळे यांचे प्रतिनिधी या सर्वांनी सहभागी करून गाबीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.

असा होईल गाबीत महोत्सव…

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २७ एप्रिलला शेकडो गाबीत मच्छीमार बांधव आपल्या होड्या सजवून गाबीत झेंडा आणि मशाली पेटवून दांडी किनारी दाखल होतील. त्यांचे महिला सुवासिनीच्या हस्ते औक्षण केले जाईल. त्यानंतर दांडी येथील शिवरायांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक “मोरयाचा धोंडा” येथील दर्शनाने वाजत गाजत भव्य अशा स्टेज जवळील “गाबीत महाज्योती” चे मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्गघाटन करण्यात येणार आहे. तसेच त्याचवेळी गाबीत समाजाचा “शिमगोत्सव” साजरा करण्यात येईल.
दुसऱ्या दिवशी २८ एप्रिल रोजी सकाळी १० ते ४ पर्यंत व्यासपीठावर मत्स्य संपदा योजना, रत्न सिंधू योजना, प्राणी शास्त्र, किमान कौशल्य आणि रोजगार व जात पडताळणी परिसंवाद होणार आहेत. तसेच सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत सिंधुदुर्गातील गाबीत समाज कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतील.
तिसऱ्या दिवशी २९ एप्रिल रोजी सकाळी १० ते २ पर्यंत पर्यटन व्यावसायिक आणि अधिकारी वर्ग परिसंवाद, सीआरझेड व पर्यावरण परिसंवाद होतील. शिवाय दांडी किनारी प्रत्यक्ष रापण लावणे, मासे पागणे, समुद्रात गरवून मासे पकडणे यांची प्रात्यक्षिके होतील. सायंकाळी ६ ते ८ “गाबीत सुंदरी” स्पर्धा आणि रात्री ८ ते १० मुंबई येथील सुप्रसिध्द “नृत्यांचा आविष्कार” कार्यक्रम संपन्न होईल. शेवटच्या चौथ्या दिवशी सकाळी १० ते ३ व्यासपीठावर गाबीत समाजातील वकील, डॉक्टर्स, प्राध्यापक, इंजिनियर्स, शास्त्रज्ञ, उच्च शिक्षित विद्वाजनांचा परिसंवाद आणि महिलांसाठी पाककला स्पर्धा, पारंपारिक गाबीत मत्स्य व इतर खाद्य पदार्थ यांची विशिष्ट प्रात्यक्षिके तसेच दांडी किनाऱ्यावर नौकानयन व पोहण्याच्या स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी ५ ते ८ स्थानिक कार्यक्रम व रात्री ९ ते १२ भव्य आर्केस्ट्रा व समारोपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

यावेळी समाजातील विविध थरातील विशेष नैपुण्य मिळविलेल्या मान्यवर ज्ञाती बांधवांचा “गाबीत समाज भूषण”पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहेत. तरी सर्व गाबीत समाज बंधू भगिनींनी गाबीत महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होवून महोत्सव यशस्वी करावा असे आवाहन गाबीत समाज सिंधुदुर्ग तर्फे करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!