आरोग्य सेविकांच्या भरतीत एन.आर.एच.एम.च्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्या

आ. वैभव नाईक यांची अधिवेशनात मागणी ; ग्रामविकासमंत्र्यांनी दर्शविली सकारात्मकता

मुंबई : ग्रामविकास विभागांतर्गत आरोग्य सेविकांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्या भरतीत एन.आर.एच. एम.अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात केली. या मागणीबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. याबद्दल एन. एच. एम. राज्य संघटनेचे अध्यक्ष किरण शिंदे, उपाध्यक्ष स्वनिल गोसावी यांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.

एन.आर.एच.एम.अंतर्गत राज्यात आरोग्य सेविकांची ३५०० पदे भरलेली आहेत. गेली १० ते १२ वर्षे या आरोग्य सेविका आरोग्य विभागात उत्तम सेवा देत आहेत. त्यांच्या प्रश्नाबाबत आरोग्य मंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने एन.आर.एच.एम. कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रियेत ४० टक्के आरक्षण व जेवढी वर्षे एन.आर.एच.एम.मध्ये सेवा केली तेवढी वर्षे वयाची अट शिथिल करण्याचा निर्णय ८ मे २०१८ रोजी दिला आहे. याकडे आ. वैभव नाईक यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. आता ग्रामविकास विभागांतर्गत आरोग्य सेविकांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्या भरतीत एन.आर.एच. एम.अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्य देण्याची मागणी आ.वैभव नाईक यांनी केली. या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे उत्तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!