रॉकगार्डन मध्ये एक कोटी खर्चून उभारेलेले म्युझिकल फाऊंटन बंद ; बोटींगही बंद अवस्थेत !
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची पालिका प्रशासनावर नाराजी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरात दाखल होणाऱ्या पर्यटकांना विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी मालवण नगरपालिकेच्या रॉकगार्डन मध्ये पर्यटन निधीतून सुमारे १ कोटी खर्चून म्युझिकल फाऊंटन कार्यान्वित करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक आणि स्थानिकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. मात्र ऐन पर्यटन हंगामात मागील महिनाभर हे म्युझिकल फाऊंटन बंद अवस्थेत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. येथील बोटींग प्रकल्प देखील वर्षभरापासून बंद आहे. पालिकेत मागील १४ महिने प्रशासकीय राजवट असून या प्रशासकीय कारभाराचा फटका रॉकगार्डनला बसला आहे. मालवणच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही मंत्रालयात फेऱ्या मारून आणि आमदार, खासदारांकडे पाठपुरावा करून निधी मिळवत विकास कामे करायची. आणि प्रशासकाच्या चुकीच्या कारभारामुळे विकास कामांच्या देखभाल दुरुस्तीबाबत हेळसांडपणा होत असेल तर ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. याबाबत पालकमंत्र्यांचेही लक्ष वेधले जाणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली आहे.
याबाबत श्री. कांदळगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मालवण हे पर्यटन शहर आहे आणि येथे दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ हा वाढताच आहे. मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ला, स्कुबा डायविंग, वॉटर स्पोर्ट्स, मालवणी जेवण हे पर्यटकाच्या पसंतीस उतरले आहे. आणि यामध्ये सध्या रॉक गार्डनची भर पडली आहे. समुद्राच्या कुशीतल हे गार्डन अल्पावधीतच पर्यटकांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामूळे या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने उदयोग सुरू होऊन रोजगाराची संधी स्थानिकांना उपलब्ध झाली आहे. अश्या ठिकाणी जर मोठया शहराच्या धर्तीवर म्युझिकल फाऊंटन बसवला तर पर्यटनाच्या दृष्टीने ते योग्य आणि जादा पर्यटक आकर्षित होणार ठरणार हे गृहीत धरून आमच्या कालावधीत हे म्युझिकल फाउंटन बसविण्यात आले होते. परंतु मागील चौदा महिन्या पासून लोकप्रतिनिधीचा कालावधी संपून प्रशासक कालावधी सुरू झाला आणि रॉक गार्डनच्या या सुविधेकडे दुर्लक्ष झाले आहे. मागील महिनाभर म्युझिकल फाऊंटन बंद आहे. त्याठिकाची म्युझिक सिस्टिमही बंद आहे. त्यामुळे फाऊंटन बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
बोटींग वर्षभरापासून बंद अवस्थेत
या ठिकाणी लहान मुलांसाठी बोट रायडिंग साठी दोन लहान तलाव बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी बोटींग पासून बऱ्यापैकी उत्पन्न पण मिळत होते. पण नादुरुस्त बोटीचे कारण सांगून बोटिंग मागील वर्षभर बंद आहे. जुन्या बोटी दुरुस्ती बाबत किंवा नविन बोटी खरेदीबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामूळे मुलांसाठी असणारं एक मनोरंजनाचे ठिकाण कमी झालं आणि त्यामुळे यापासून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान पण झाले आहे.
प्रवेशफी गोळा करण्यात अनियमितता
म्युझिकल फाऊंटन बसविल्यानंतर या ठिकाणी नाममात्र पाच रुपये प्रवेश फी बसविण्यात आली आहे . ज्यामुळे नगरपरिषदेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षीत आहे. पण योग्य नियोजन नसल्याने लाखो पर्यटक भेट देऊनही त्यामानाने फी ची रक्कम प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झालेले आहे.
टॉयलेटची अपुरी व्यवस्था
या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. त्यामूळे टॉयलेट व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामूळे कायम स्वरूपी उपाययोजना करेपर्यंत मागील दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या, आणि दुरुस्ती देखभालचे टेंडर न केल्याने बंद असलेल्या बायोटॉयलेट गाड्यापैकी एक गाडी याठिकाणी ठेवण्याबाबत सूचना करूनही कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामूळे पर्यटकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे आणि पर्यायाने नगरपरिषदेची आणि पर्यटन दृष्ट्या मालवणची बदनामी होत आहे.
प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपापल्या कालावधीत आपापल्या परीने पर्यटनाच्या दृष्टीने हे रॉक गार्डन जास्तीत जास्त कसे आकर्षित दिसेल याबाबत मेहनत घेतली आहे. पण सध्या प्रशासक पदाच्या १४ महिन्याच्या कालावधीतील दुर्लक्षामुळे ही अशी दुर्दशा झालेली आहे. प्रशासक याना वेळोवेळी कळवून , निदर्शनास आणूनही ही परिस्तिथी उद्भवली आहे. याला जबाबदार अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. मुख्याधिकारी आणि प्रशासक हे पद एकाच व्यक्ती कडे असल्याने आणि त्यावर कोणाचाच अंकुश नसल्याने सर्वच विकास कामाबाबत ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
पिंपळपार येथील गार्डन मधील कारंजा गेले सात आठ महिने बंद
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारा आणि शहर सुशोभीकरणात भर पडावी या दृष्टिकोनातून बसविण्यात आलेला पिंपळपार येथील कारंजा गेली सात ते आठ महिने बंद आहे. त्याचप्रमाणे गेट तुटून पडले आहे. लाईट बंद पडल्या आहेत. याबाबत सूचना देऊनही कुठलीही कार्यवाही झालेली नाही, असे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.