भाजपा नेते निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये “शिवगर्जना महानाट्य !

विशालसेवा फाउंडेशन आणि भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने आयोजन : संजू परब, विशाल परब यांची माहिती

कुडाळ : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्ताने विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग व भाजपा सिंधुदुर्ग आयोजित भव्य दिव्य कोकण पर्यटन महोत्सव २०२३ आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने “शिवगर्जना” हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १७ मार्चला सायंकाळी ५ कुडाळ केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथील नवीन बस स्टँडच्या मैदानात होणार आहे, अशी माहिती भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते संजू परब आणि युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी कुडाळ मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष दादा साईल, विशाल कुडाळकर आदी उपस्थित होते. यावेळी संजू परब म्हणाले, निलेश राणे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळयाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, खासदार उदयनराजे भोसले, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, सत्कार मूर्ती माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, गोव्याचे आमदार जीत आरोलकर, किरण उर्फ भैय्या सामंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा संपूर्ण कार्यक्रम विशाल सेवा फाऊंडेशन सिंधुदुर्ग व भाजपा सिंधुदुर्ग यांच्यावतीने होणार आहे. विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तसेच भाजपा युवा नेते व युवा उद्योजक विशाल परब हे दरवर्षी माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस अतिशय भव्य दिव्य साजरा करतात. यावर्षी त्यापेक्षाही मोठा वाढदिवस सोहळा करण्याचा आमचा मानस आहे, असे ते म्हणाले. या महानाट्यात सिंधुदुर्गातील स्थानिक कलाकारांनाही काम करण्याची संधी मिळणार आहे. ११० फूट रुंद व २०० फूट लांबीच्या रंगमंचावर फटाक्यांच्या आतषबाजीत होणार शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा होणार असून या महानाट्यात ७०० कलाकारांसह ५० घोडे, उंट, हत्ती अशा विविध प्राण्यांचा सहभाग असणार आहे. सिंधुदुर्गातील जनतेला या महानाट्याचा लाभ घेता यावा, शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी यांना शिवछत्रपतींची यशोगाथा समजावी हा या महानाट्याचा उद्देश आहे. शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना महानाट्याचे मोफत पास मिळणार आहेत. या महानाट्यासाठी ५० हजार लोकांची बैठक व्यवस्था असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!