२०२४ च्या भाजपच्या विजयात युवकांनी ध्येयवेडे होऊन काम करा…!

मालवण मधील युवक संवाद मेळाव्यात भाजपा प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांचे प्रतिपादन

मालवणमध्ये दरवर्षी भव्य दिव्य पर्यटन सांस्कृतिक महोत्सव भरवण्याची घोषणा

विकासासाठी निलेश राणेंची तळमळ कौतुकास्पद ; कुडाळ – मालवण मधून त्यांना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करूया : दत्ता सामंत

मालवण | कुणाल मांजरेकर

आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह सर्वच निवडणुकीत भाजपाचाच विजय निश्चित आहे. मात्र भाजपच्या या विजयात युवकांचे योगदान किती हे महत्वाचे आहे. त्यासाठी युवा वर्गाने धेय्यवेडे होऊन काम करा. जनतेची सेवा करा, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण मध्ये आयोजित युवक संवाद मेळाव्यात बोलताना केले. आगामी मालवण नगरपालिका निवडणुकीत गुलाल आणि फटाके भाजपचेच असणार आहेत. येथील सर्व निवडणुकीतही १०० टक्के यश भाजपला मिळणार. वैभव नाईकला देखील जनता घरी बसवणार, असे सांगून मालवणात दरवर्षी भव्यदिव्य पर्यटन सांस्कृतिक महोत्सव भरवणार असल्याची घोषणा निलेश राणे यांनी केली.

भारतीय जनता युवा मोर्चा मालवण शहर युवक संवाद मेळावा शुक्रवारी सायंकाळी येथील दैवज्ञ भवन सभागृहात युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी निलेश राणे यांच्यासह भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, उद्योजक दीपक परब, शहर प्रभारी विजय केनवडेकर, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, अभय कदम, भाई मांजरेकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, निकीत वराडकर, सरचिटणीस निषय पालेकर, राकेश सावंत, फ्रँसिस फर्नांडिस, चंद्रकांत मयेकर, गौरव लुडबे यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी निलेश राणे म्हणाले, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपमध्ये कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. संधी प्रत्येकाला मिळते. मात्र प्रामाणिक कामातून प्रत्येकाने यश मिळवले पाहिजे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक वेगळ्या उंचीवर नेले. आज ना. राणे देशाच्या राजकारणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर व खंबीर नेतृत्वाखाली देशपातळीवर काम करत आहेत. मात्र त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात या मतदारसंघात काम केले, त्याला तोड नाही. यापुढेही मालवण कुडाळसह जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधींचा विकासनिधी आणायचा आहे.

दत्ता सामंत, अशोक सावंत यांसह निष्ठावंतांचे कौतुक

सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ही पक्षाची संपत्ती आहे. दत्ता सामंत, अशोक सावंत यांच्यासारखे निष्ठावंत नेते आपल्याकडे आहेत. दत्ता सामंत यांना अनेक पक्षातून ऑफर आल्या. मात्र हा जन्म राणेसाहेबांचा आहे, असे त्यांनी संबंधिताना ठासून सांगितले. अशोक सावंत सांगतात ३३ वर्ष राणे साहेबांसोबत, यापुढेही राणे साहेबांसोबत. असे सच्चे सहकारी ही पक्षाची संपत्ती आहेत. असे सांगत निलेश राणे यांनी सर्वांचे कौतुक केले.

सत्तेची नशा ठाकरेंच्या डोक्यात गेली आणि सत्ता गेली. त्यामुळे कधीही अहंकार असता नये, असे सांगून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विशेष आठवण निलेश राणे यांनी काढली. आज अनेक पक्षात बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली नेतेमंडळी आहेत. हे बाळासाहेब ठाकरेंचे कर्तृत्व आहे. असे निलेश राणे म्हणाले.

कार्यक्रमात भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी प्रास्ताविक करत प्रथम देश, नंतर पक्ष, नंतर मी या भाजप पक्षाच्या धेय्य धोरणानुसार काम करून युवकांनी संघटना अधिक मजबूत करत काम करूया. असे आवाहन केले. यावेळी उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांनीही विचार मांडले. तसेच जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनीही आपल्या आक्रमक व प्रभावी शैलीत विचार मांडले. या मेळाव्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. यावेळी शहरातील युवक पदाधिकारी यांना नियुक्ती देण्यात आल्या. निलेश राणे, दत्ता सामंत यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबाबत ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर व सहकारी यांचे विशेष कौतुक केले.

निलेश राणे यांना आमदार करण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करूया : दत्ता सामंत

महाराष्ट्र प्रदेश सदस्य दत्ता सामंत म्हणाले, युवकांनी निलेश राणे यांना आदर्श ठेऊन काम करावे. तरुण वयात देशाचे सर्वोच्च सभागृह संसदेत खासदार म्ह्णून त्यांनी काम केले. जनतेला न्याय देण्याचे काम निलेश राणे करत असतात यांची तळमळ कौतुकास्पद व आदर्शवत आहे. आगामी काळात मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात निलेश राणे यांना बहुमताने आमदार करण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करूया. निलेश राणे यांच्या पाठीशी खंबीर रहा. आगामी निवडणुकीत भाजपच्या १०० टक्के यशासाठी सर्वांनी काम करा. सातत्य राखा. असे आवाहन भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!