तोंडवळी ग्रामस्थांचे उपोषण स्थगित…

आ. वैभव नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीतून २० लाखांच्या मंजुरीचे पत्र

मालवण : तोंडवळी सुरुबन रस्त्याबाबत तोंडवळीवासियांनी सुरु केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशी आमदार वैभव नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीतून २० लाख रुपये मंजूरीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कमलिनी प्रभू यांनी दुपारी उपोषणस्थळी सरपंच नेहा तोंडवळकर यांना दिल्यानंतर तोंडवळी वासियांनी उपोषण पुढील तीन महिन्यासाठी तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. रस्त्याच्या कामात दिरंगाई झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी रस्त्याच्या मानाने निधी अपुरा असला तरी आवश्यकता भासल्यास आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसेच भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनीही ग्रामस्थांना फोनवरुन उपोषणास पाठिंबा जाहिर करत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आवश्यकता भासल्यास निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी बाबी जोगी, वासुदेव पाटील, आबा कांदळकर, दिपक कांदळकर, उपसरपंच हर्षद पाटील, संजय केळुसकर, गणेश तोंडवळकर यांसह अन्य महिला, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

तोंडवळी येथील वन विभागाच्या जागेतील ६०० मीटर रस्त्यासह एकूण साडे पाच किमीच्या रस्त्यासाठी सुमारे दोन कोटी पेक्षा निधीची आवश्यकता आहे. मात्र या रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. रस्त्याबाबत निधी उपलब्धता व प्रशासकीय मान्यतेबाबत जोपर्यंत प्रशासकीय पातळीवर लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे तोंडवळी ग्रामस्थांनी सांगत कालपासून उपोषणास सुरवात केली होती. तोंडवळी येथील रस्ताप्रश्नी सरपंच नेहा तोंडवळकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तोंडवळी सुरू बन याठिकाणी आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुजाता पाटील, स्नेहल पाटील, मानसी चव्हाण, अनन्या पाटील, माजी सरपंच आबा कांदळकर, जयहरी कोचरेकर, गणेश तोंडवळकर, संजय केळुसकर, दीपक कांदळकर, वासुदेव पाटील, आशिष पाटील, ताता टिकम, ऍड ओंकार केणी यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. याबाबत आज प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही होत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कमलिनी प्रभू यांनी आमदार वैभव नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीतून २० लाख रुपये निधीचे पत्र सरपंच नेहा तोंडवळकर यांना सुपुर्द करुन देत रस्ता कामाबाबत प्रस्ताव सादर करण्यास किमान डांबरीकरणास कोणतीही अडचण येणार नसल्याचे सांगितले. प्रस्ताव सादर करण्यास निधी नाही तर प्रशासकीय मान्यता हवी होती ती मिळाली. यानंतर पर्यावरण आणि वनविभागाच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर करावे लागतील यादृष्टीने साधारण महिनाभराचा अवकाश लागेल असे सांगितले. यामुळे ग्रामस्थांनी पुढील तीन महिन्याचा अवकाश देत कामात दिरंगाई झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा देत दुपारनंतर उपोषण तात्पुरते स्थगित केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!